Bird Flu : कोरोनादरम्यान नवीन संकट! बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 11:02 IST2022-01-06T09:26:23+5:302022-01-06T11:02:55+5:30
Bird Flu : वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थने (OIE) म्हटले आहे की, आशिया आणि युरोपमध्ये बर्ड फ्लूचे एकापेक्षा जास्त व्हेरिएंट असल्यामुळे ते मानवांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त आहे.

Bird Flu : कोरोनादरम्यान नवीन संकट! बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायसरचा संसर्ग वाढत असताना बर्ड फ्लूबाबत (Bird Flu) तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थने (OIE) म्हटले आहे की, आशिया आणि युरोपमध्ये बर्ड फ्लूचे एकापेक्षा जास्त व्हेरिएंट असल्यामुळे ते मानवांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त आहे.
वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थचे महासंचालक मोनिक एलॉइट म्हणाले, 'या वेळी परिस्थिती अधिक कठीण आणि अधिक धोकादायक आहे, कारण आम्ही पाहत आहोत की एकापेक्षा जास्त व्हेरिएंट समोर येत आहेत, ज्यामुळे यावर नियंत्रित करणे कठीण झाले आहे. जोखीम ही आहे की हा म्यूटेंट आहे किंवा तो मानवी फ्लू व्हायरसमध्ये मिसळतो, जो मानवापर्यंत पोहोचू शकतो आणि नंतर तो अचानक नवीन परिमाण घेतो.'
मिररच्या रिपोर्टनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबरच्या अखेरीस, 15 देशांमध्ये पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला होता, ज्यात बहुतांश H5N1 स्ट्रेन होता. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थच्या डेटानुसार, युरोपमध्ये 285 उद्रेकांसह इटलीत सर्वात वाईट परिणाम झाला होता आणि जवळपास चार मिलियन पक्षी मारले गेले. बर्ड फ्लू सहसा हिवाळ्यात सुरू होतो, जो जंगली पक्ष्यांच्या हालचालींद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संसर्ग पसरतो.
नवीन स्ट्रेन मानवांमध्ये अधिक संसर्गजन्य
वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थने म्हटले आहे की, जवळपास 850 लोकांना बर्ड फ्लूच्या H5N1 व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी निम्म्या लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये अनेक लोकांना H5N6 स्ट्रेनची लागण झाली होती. यामुळे काही तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आधीच प्रसारित होणारा स्ट्रेन बदलला आहे आणि लोकांसाठी अधिक संसर्गजन्य असू शकतो.
दरम्यान, 'बहुतेक देशांनी प्रादुर्भाव नियंत्रित करणे शिकले आहे आणि बर्ड फ्लू सहसा जवळच्या संपर्कातून जातो, कारण मानवांमध्ये संसर्ग तुरळक असेल. जर एक, दोन किंवा तीन लोकांना संसर्ग झाला असेल तर तो चिंताजनक आहे, मात्र, हे अवलंबून असेल की लोक कसे संक्रमित झाले आहेत', असे वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थचे महासंचालक मोनिक एलॉइट यांनी सांगितले.