डायबिटीसच्या रुग्णांसाठी गुड न्यूज! फ्रिजमध्ये न ठेवताही सुरक्षित राहणार 'हे' नवं इन्सुलिन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 02:16 PM2021-09-26T14:16:41+5:302021-09-26T15:56:50+5:30
इन्सुलिन ठेवण्यासाठी थंड तापमान आवश्यक असतं. लांबच्या प्रवासात इन्सुलिन सोबत घेण्याच्या या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक इन्सुलिन तयार केलं आहे, जे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं महत्वाचं आहे. यासाठी रुग्ण औषधं आणि कधीकधी इन्सुलिन इंजेक्शन घेतात. जेव्हा त्यांना कुठेतरी प्रवास करावा लागतो तेव्हा इन्सुलिन सोबत नेण्यास अडचण येते. कारण इन्सुलिन ठेवण्यासाठी थंड तापमान आवश्यक असतं. लांबच्या प्रवासात इन्सुलिन सोबत घेण्याच्या या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक इन्सुलिन तयार केलं आहे, जे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही.
रूम टेम्प्रेचरला इन्सुलिन सुरक्षित
हे इन्सुलिन Thermostable असेल (खोलीच्या तपमानात सुरक्षित). हे कोलकाताच्या बोस इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी (IICB) च्या दोन शास्त्रज्ञांसह हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (IICT) च्या दोन शास्त्रज्ञांनी तयार केलं आहे.
बोस इन्स्टिट्यूटचे शुभ्रंगसू चॅटर्जी यांच्यासह आयआयसीबीचे शास्त्रज्ञ पार्थ चक्रवती, IICTचे बी जगदीश आणि जे रेड्डी यांनी यावर संशोधन केलं, त्यानंतर हे इन्सुलिन तयार करण्यात आलं आहे.
फ्रिजमधून बाहेर काढणं शक्य
या संशोधनाचा उल्लेख आंतरराष्ट्रीय विज्ञान जर्नलमध्येही करण्यात आला आहे. बोस इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक सदस्य शुभ्रांगसू चॅटर्जी यांच्या मते, 'तुम्ही हे इन्सुलिन तुम्हाला हवं तोपर्यंत फ्रीजमधून बाहेर ठेवू शकता. यानंतर, जगभरातील मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलिन सोबत नेणं सोपं होईल.
'इन्सुलॉक' नाव आहे
त्यांनी सांगितलं की, सध्या आम्ही त्याचे नाव 'इन्सुलॉक' ठेवलं आहे. आम्ही लवकरच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे (DST) आचार्य जगदीशचंद्र बोस यांच्या नावं या इन्सुलीनला द्यावं यासाठी अपील करणार आहोत.