आता तुमचं नख सांगणार शरीरातील रक्ताचं प्रमाण; लवकरच येणार खास अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:29 PM2018-12-05T17:29:46+5:302018-12-05T17:31:05+5:30
आता रक्त न घेताच तपासता येणार शरीरातील रक्ताचं प्रमाण
नवी दिल्ली: शरीरातील रक्ताचं प्रमाण तपासण्यासाठी रक्त घ्यावं लागतं. मात्र आता शरीरातून रक्त न घेताही रक्ताचं प्रमाण योग्य आहे की नाही, याची तपासणी करता येणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे हे तपासण्यासाठी नखाचा फोटो पुरेसा असेल. अमेरिकेच्या इमोरी विद्यापीठातील वैज्ञानिकांनी तयार केलेल्या अॅपमुळे अगदी सोप्या पद्धतीनं शरीरातील रक्ताचं प्रमाण तपासता येईल. नखाचा फोटो अॅपवर अपलोड केल्यावर रक्ताचं प्रमाण तपासता येईल. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण नेमकं किती आहे, याची माहितीदेखील हे अॅप देईल.
केवळ नखाच्या फोटोतून शरीरातील रक्ताचं प्रमाण तपासणारं हे एकमेव अॅप असल्याचा दावा संधोशक विल्बर लाम यांनी केला आहे. शरीरातील रक्ताचं प्रमाण तपासण्यासाठी रक्त घ्यावं लागतं. सध्या सर्वत्र हीच पद्धत प्रचलित आहे. मात्र हे नवं अॅपदेखील त्याच पद्धतीइतकं अचूक असल्याचा दावा लाम यांनी केला आहे. रक्त न काढताही त्याची तपासणी करता येणं, हेच या अॅपचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच हे अॅप इतरांपेक्षा वेगळं आहे, असा दावादेखील त्यांनी केला. या अॅपमध्ये मानकांनुसार काही फोटो टाकण्यात आले आहेत. वापरकर्त्यांनी त्यांच्या नखांचा फोटो अॅपवर अपलोड केल्यावर दोन्ही फोटोंची तुलना करुन शरीरातील रक्ताचं प्रमाण सांगितलं जाईल.
या अॅपच्या माध्यमातून शरीरातील रक्ताचं नेमकं प्रमाण समजतं. मात्र यातून कोणताही आजार कळत नाही, असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. या अॅपचा वापर अगदी सहजपणे करता येईल. गर्भवती, खेळाडूंसाठी हे अॅप अतिशय फायदेशीर ठरेल, असं संशोधकांनी सांगितलं. जगातील दोन अब्ज लोकांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी आहे. सध्या जगभरात रक्ताचं प्रमाण तपासण्यासाठी सीबीसी (कम्प्लीट ब्लड काऊंट) केलं जातं. मात्र या अॅपमुळे केवळ नखाच्या फोटोंवरुन रक्ताचं प्रमाण तपासता येईल. याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.