सेकंड-हॅंड स्मोकिंगनेही हृदयाला धोका - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 10:21 AM2018-12-29T10:21:31+5:302018-12-29T10:21:49+5:30
जर आतापर्यंत तुम्ही हा विचार केला असेल की, केवळ धुम्रपान करणे शरीर आणि हृदयासाठी नुकसानकारक आहे तर तुम्ही चुकीचा विचार करताय.
जर आतापर्यंत तुम्ही हा विचार केला असेल की, केवळ धुम्रपान करणे शरीर आणि हृदयासाठी नुकसानकारक आहे तर तुम्ही चुकीचा विचार करताय. जर तुमच्या परीवारातील कुणी सदस्य किंवा ऑफिसमधील कुणी मित्र धुम्रपान करत असेल आणि त्यांच्या शेजारी बसून तुम्ही सेकंड-हॅंड स्मोकिंग करत असाल. म्हणजे सिगारेट आणि तंबाखूच्या धुराच्या संपर्कात राहत असाल तर तुमच्या हृदयाला नुकसान पोहोचू शकतं.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, याबाबत खुलासा झाला आहे. यात सांगण्यात आलं आहे की, लागोपाठ सेकंड हॅंड स्मोकिंग म्हणजे सिगारेटच्या धुराच्या संपर्कात राहिल्याने हृदयाच्या इलेक्ट्रिकल अॅक्टिविटीमध्ये बदल होतो. ज्या कारणाने हृदयाचे ठोके म्हणजेच हार्ट बीट असामान्य होतात.
पेशींमध्ये होतो बदल
हा अभ्यास नुकताच उंदरांवर करण्यात आला. ज्यातून ही बाब समोर आली की, भलेही धुम्रपान दुसरं कुणी करत असो, पण तुम्ही त्या धुराच्या सतत संपर्कात राहिलात तर तुमच्या हृदयाला रेग्युलेट करणाऱ्या पेशींमध्ये बदल बघायला मिळतो. इन्वायर्नमेंटल हेल्थ पर्सपेक्टिव नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या अभ्यासाचे निष्कर्ष यावर जोर देतात की, तंबाखूचा धूर हा केवळ धुम्रपान करणाऱ्यांसाठीच नाही तर धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्याही हृदयाला नुकसान करतो.
यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे सहायक प्राध्यापक क्रिस्टल रिपलिंगर सांगतात की, 'केवळ धुम्रपान करुन नाही तर सिगारेटच्या धुराच्या संपर्कात तुम्ही सतत राहिल्यानेही तुमच्या हृदयाचं नुकसान होऊ शकतं, ही बाब लोकांपर्यंत पोहोचवणे फार गरजेचे आहे'.
तंबाखूच्या धुरामुळे हृदयाच्या क्रियेसाठी आवश्यक पेशींमध्ये बदल होतो हे सांगणारा पहिलाच अभ्यास आहे. त्यामुळे धुम्रपानापासून दूर राहण्यासोबतच धुम्रपान करणाऱ्यांपासूनही दूर राहणं फार गरजेचं आहे.
धुम्रपानामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत सर्वांनाच माहिती आहे. तरी सुद्धा लोक धुम्रपानाची सवय लावून बसले आहेत. एका रिसर्चनुसार, भारतीय धुम्रपान करण्यात सर्वात पुढे आहेत आणि ते दिवसातून जवळपास ८.२ सिगारेट पितात. सिगारेटच्या धुरामध्ये २०० प्रकारचे नुकसानकारक तत्त्व असतात. जर त्यांनी धुम्रपान सोडलं तर त्यांचं शरीर पुन्हा ठीक होऊ शकतं. पण हे फायदे वेळेनुसार बघायला मिळतात.
लहान मुलांसाठीही धोकादायक
तुम्हाला घरात धुम्रपान किंवा स्मोकिंग करण्याची सवय असेल आणि जर तुमच्या घरात कोणी लहान मुल असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार घरात धुम्रपान केल्याने लहान मुलं आजारी पडतात ज्यामुळे त्यांना वारंवार रुग्णालय किंवा दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतात. 24 टक्के मुलांचे कुटुंबिय घरातच धुम्रपान करत असल्याचं समोर आलं होतं.
'आम्ही केलेल्या संशोधनात घरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाचा वापर होत असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचं', अॅशली मेरिअनोस यांनी सांगितलं आहे. नॅशनल सर्व्हे ऑफ चिल्ड्र्न हेल्थ 2011-12 ची पाहणी केली असता हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये नुकत्याच जन्मलेल्यांपासून ते 17 वर्षाच्या मुलांवर सर्व्हे करण्यात आला होता.