घरापेक्षाही ऑफिसमध्ये जास्त आनंदी राहतात महिला - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 10:15 AM2018-12-19T10:15:26+5:302018-12-19T10:22:51+5:30
नोकरी करणारे जास्तीत जास्त लोक हे घरापेक्षा जास्त वेळ कामाच्या ठिकाणी म्हणजेच ऑफिसमध्ये घालवतात.
(Image Credit : bellanyc.com)
नोकरी करणारे जास्तीत जास्त लोक हे घरापेक्षा जास्त वेळ कामाच्या ठिकाणी म्हणजेच ऑफिसमध्ये घालवतात. मात्र अनेकजण हे ऑफिसला तणावाची जागा मानतात आणि सायंकाळी घरी परतण्याची सतत वाट बघत बसलेले दिसतात. पण या प्रसिद्ध धारणेच्या अगदी उलटा विचार अमेरिकेत करण्यात आलेल्या एका शोधातून समोर आला आहे. अमेरिकेतील पेन स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, काही लोकांना खासकरुन महिलांना घराच्या तुलनेत ऑफिसमध्ये कमी तणाव जाणवतो. हे वाचून तुम्हीही विचारात पडला असाल..पण हे खरंय. चला जाणून घेऊ काय सांगतो रिसर्च...
कसा केला अभ्यास?
(Image Credit :MeaningfulWomen.com)
हा रिसर्च करणाऱ्या अभ्यासकांनी आठवडाभर यात सहभागी झालेल्या १२२ लोकांच्या कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हॉर्मोन्सच्या प्रमाणाची तपासणी केली आणि सोबतच त्यांना दिवसातील वेगवेगळ्या वेळेत त्यांचा मूड कसा होता, यावर रेटींग द्यायला सांगण्यात आलं. या रिसर्चनच्या निष्कर्षातून हे समोर आलं की, काही लोक घराच्या तुलनेत ऑफिसमध्ये कमी तणावात दिसले.
पुरुषांबाबत हे उलटं
या विषयावर जेव्हा गंभीरतेने विचारपूस केली तेव्हा अभ्यायकांना असं आढळलं की, महिला ऑफिसमध्ये घरच्यापेक्षा जास्त आनंदी-खूश राहतात. तर पुरुष हे ऑफिसपेक्षा जास्त घरी आनंदी असतात. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतही हे परिणाम एकसारखे बघायला मिळाले.
काय आहे याची कारणे?
(Image Credit : www.workingmother.com)
अभ्यासकांच्या सांगण्यानुसार, जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे कामातून मिळणारं समाधान हे याचं महत्त्वाचं कारण आहे. असे बघायला मिळते की, महिलांना जी नोकरी पसंत येत नाही, ती त्या सहजपणे सोडतात आणि अशी नोकरी निवडतात ज्यात त्यांना आनंद मिळेल. तेच पुरुषांबाबत हे उलटं आहे. ते त्यांना न आवडणारी नोकरीही करतच राहतात. त्यांना कळत असतं की, यातून आनंद मिळत नाही तरी ते ती नोकरी सोडण्यासाठी धडपड करताना दिसत नाही. पण महिला लगेच याबाबत निर्णय घेतात. या रिसर्चमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, आई असणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या महिला त्या महिलांच्या तुलनेत कमी तणावात असतात, ज्यांना मुलं-बाळं नसतात.
कमी तणाव कधी?
(Image Credit : www.dailyexcelsior.com)
तुम्ही या गोष्टीचा अंदाज लावू शकता का की, आठवड्याच्या कोणत्या दिवशी लोक सर्वात कमी तणावात असतात? याचं योग्य उत्तर आहे वीकेंड. या रिसर्चमध्ये सहभागी लोकांना वीकेंड दरम्यान सर्वात कमी तणाव असल्याचं आढळलं. अर्थातच वीकेंडला लोकांच्या डोक्यावर कामाचं कोणतही टेन्शन नसतं.
एक्सपर्ट काय सांगतात?
या अभ्यासाबाबत एक्सपर्ट्सचं मत आहे की, ऑफिसमध्ये महिला केवळ आपल्या कामावर फोकस करतात आणि त्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये कमी तणाव जाणवतो. पण जेव्हा त्या घरी परततात तेव्हा त्यांना घरातील कामांसाठी सेंकड शिफ्ट सुरु करावी लागते. तसेच वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यामुळेच त्यांचा तणाव वाढतो. त्यामुळेही त्यांना घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त आनंद मिळत असावा.