Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांसाठी दिलासादायक बातमी; AIIMS च्या रिपोर्टमधून नवा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 09:56 AM2021-06-05T09:56:49+5:302021-06-05T09:59:48+5:30
Coronavirus Vaccination: लसीकरणानंतरही काही जणांना कोरोनाची लागण झाली. परंतु एम्सच्या रिपोर्टमुळे दिलासा मिळताना दिसत आहे.
नवी दिल्ली – कोरोना लस घेण्यासाठी आजही अनेक लोक घाबरत आहेत. ग्रामीण भागात कोरोना लसीकरणापासून वाचण्यासाठी लोकं पळ काढताना दिसत आहेत. त्यातच ऑल इंडिया इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स(AIIMS) च्या रिपोर्टनुसार कोरोना लसीकरण किती महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या लढाईत लसीकरण एका शस्त्राचं काम कसं करतं याबाबत खुलासा झाला आहे.
लसीकरणानंतरही काही जणांना कोरोनाची लागण झाली. परंतु एम्सच्या रिपोर्टमुळे दिलासा मिळताना दिसत आहे. लसीकरणानंतर कोरोना संक्रमण झालेल्यांची चाचणी केली त्यात एकाही रुग्णांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला नसल्याचं सकारात्मक चित्र आहे. इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांच्यातील कोणाचाही संक्रमित झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. एप्रिल-मे महिन्याच्या आकडेवारीतून हा रिसर्च करण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल-मे महिन्यात अनेकांचा जीव गेला होता.
ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन किंवा एक डोस घेतला आहे आणि जर ते कोरोना संक्रमित झाले तर त्यांना ब्रेकथ्रू इन्फेशन म्हणतात. एम्सनं एप्रिल-मे महिन्यात ब्रेकथ्रू इन्फेक्शनवर अभ्यास केला. त्यात लस घेतलेल्यांमध्ये वायरल लोड जास्त असला तरी संक्रमणामुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचं समोर आलं. एम्सनं ६३ ब्रेकथ्रू इन्फेक्शन झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला. त्यातील ३६ रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर २७ रुग्णांनी लसीचा एक डोस घेतला होता.
या ६३ मधील १० रुग्णांनी कोविशिल्ड आणि ५३ रुग्णांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. यातील कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. अलीकडेच आणखी २ रिसर्चमध्ये चांगले संकेत मिळाले आहेत. त्यानुसार, कोरोना संक्रमणातून बरे झालेले आणि कोरोना लस घेतलेल्यांमध्ये वायरलविरोधात लढण्याची क्षमता जास्त झाल्याची पाहायला मिळते. म्हणजे या दोन्ही प्रकारात कोरोनाविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती अनेक दिवस शरीरात सक्रीय राहते. कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये कमीत कमी १ वर्ष रोगप्रतिकार शक्ती कायम असते. काही लोकांना याहून अधिक काळ इम्युनिटी राहते.
सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली असून तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही घट होत आहे. शुक्रवारी या संसर्गामुळे २,७१३ जण मरण पावले. गुरुवारपेक्षा हा आकडा १७४ ने कमी आहे. नव्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून शुक्रवारी १ लाख ३२ हजार ३६४ नवे रुग्ण सापडले व २ लाख ७ हजार ७१ जण बरे झाले. नीती आयोगाच्या सदस्याने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होऊ शकते, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. मात्र या लाटेपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.