अभ्यासातून धक्कादायक खुलासा! ध्वनीप्रदुषणामुळे ६० मिलियन भारतीयांच्या श्रवणक्षमतेवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 03:31 PM2022-04-04T15:31:53+5:302022-04-04T15:34:27+5:30
भारतात ध्वनिप्रदूषणामुळे (Noise Pollution) श्रवणशक्ती कमी होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा धक्कादायक खुलासा संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) अहवालात करण्यात आला (Noise Pollution and Hearing Problem) आहे.
सातत्याने वाढणारे ध्वनी प्रदूषण हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सतत वाढत जाणारी रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, रेल्वे, यंत्रसामग्री, उद्योग आणि खूप मोठ्या आवाजात संगीत ऐकणे हे ध्वनी प्रदूषणाचे प्रमुख घटक मानले जातात. आता भारतात ध्वनिप्रदूषणामुळे (Noise Pollution) श्रवणशक्ती कमी होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा धक्कादायक खुलासा संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) अहवालात करण्यात आला (Noise Pollution and Hearing Problem) आहे.
या अहवालानुसार, भारतातील ६३ दशलक्ष लोकांची श्रवणशक्ती कमी होत आहे. इतकेच नाही तर, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) द्वारे जारी केलेल्या वार्षिक 'फ्रंटियर्स रिपोर्ट २०२२ (Frontiers 2022: Noise, Blazes and Mismatches)' मध्ये भारतातील मुरादाबाद शहराला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ध्वनी प्रदूषित शहर घोषित केलं आहे.
तरुण वेगाने श्रवणशक्ती गमावत आहेत
दैनिक हिंदुस्थान वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. विशेषत: यामुळे भारतातील तरुणांची श्रवणशक्ती (Hearing Ability) झपाट्याने कमी होत आहे. असेच होत राहिल्यास २०३० पर्यंत भारतातील श्रवणदोषांची संख्या दुप्पट म्हणजे १३० दशलक्षांपेक्षा जास्त होईल. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, भारतातील १० पैकी फक्त दोन लोक या समस्येवर उपचार घेतात आणि श्रवणयंत्र वापरतात.
जगातील १ अब्ज लोकांची श्रवणशक्ती कमी झाली
अहवालात असे म्हटले आहे की, मोठ्या आवाजातील संगीत आणि मनोरंजनाच्या इतर साधनांद्वारे दीर्घकाळापर्यंत आवाज कानावर पडल्याने जगभरातील १२ ते ३५ वयोगटातील सुमारे एक अब्ज लोकांच्या श्रवणशक्तीला धोका निर्माण होत आहे. जगभरातील सुमारे दीड अब्ज लोक कमी श्रवणशक्तीसह जीवन जगतात. ताज्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत ही संख्या दोन अब्जांपेक्षा जास्त होऊ शकते.