क्रांतिकारी संशोधनामुळे आता कर्करोगाचे निदान केवळ रक्त तपासणीने शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 05:11 PM2020-02-10T17:11:45+5:302020-02-10T17:21:41+5:30
भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांनी आपल्या नव्या संशोधनाद्वारे आजाराची कुठलीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या रक्तामधीलही कॅन्सरपेशीं असतात.
(image credit- medical news today)
भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांनी आपल्या नव्या संशोधनाद्वारे आजाराची कुठलीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या रक्तामधीलही कॅन्सरपेशीं असतात. त्यांचा समूह हुडकून काढणाऱ्या नॉन-इन्व्हेजिव स्क्रीनिंग आणि डायग्नोस्टिक पद्धतीच्या अभिनव तपासणीचे पुरावे मांडले आहेत. या तपासणीमुळे कर्करोगाची चाचणी सोपी, परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होणार असून कर्करोग निदानासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. लवकरच व्यावसायिक पातळीवर ही तपासणी पद्धत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या संशोधनाचे मुख्य लेखक आणि दातार कॅन्सर जेनेटिक्सचे संशोधक संचालक डॉ. दादासाहेब अकोलकर म्हणाले, “कर्करोगाच्या नव्या प्रणालीचे मापदंड निश्चित करण्यासाठी १६ हजारांहून अधिक जणांच्या बाबतीत संशोधन करून रक्तात फिरणाऱ्या ट्यूमरचे अस्तित्व शोधून काढणारे हे अशा प्रकारचे पहिलेच संशोधन आहे. आम्ही जी पद्धत वापरली आहे ती, नव्या वाटा खुली करणारी आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील ट्यूमरपासून ज्यावेळी पेशींचा समूह अलग होतो आणि रक्तप्रवाहात शिरतो, त्यावेळी अवघ्या १० मिली रक्तनमुन्याचा वापर करून आपण १० कोटी पेशींपासून काहीशे घातक पेशी अचूकपणे आणि प्रभावीपणे वेगळ्या करू शकतो. कर्करोगाच्या सर्वच नमुन्यंमध्ये हे पेशीसमूह अस्तित्वात होते, परंतु कर्करोग नसलेल्या काही नमुन्यांमध्येही ते आढळून आले.
या महत्त्वाच्या शोधाबद्दल आणि तंत्राबद्दल दातार कॅन्सर जेनेटिक्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राजन दातार म्हणाले, “कर्करोग हे आपल्या एकूण संस्कृतीसमोरचेच आव्हान बनत चालले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कर्करोगाने होणारे बरेचसे मृत्यू हे प्रामुख्याने कर्करोगाचे उशिरा निदान झाल्यामुळे होतात. त्यामुळे रक्ततपासणीवर आधारित ही नावीन्यपूर्ण चाचणी कर्करोगाच्या तपासणीत क्रांतिकारी ठरेल आणि वरवर निरोगी वाटणाऱ्या, पण शरीरात घातक पेशी दडलेल्या अवस्थेत असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत सोप्या व रुग्णांसाठी सोयीच्या अशा निदानाच्या माध्यमातून परिणामांवर प्रभाव टाकणारी ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.
बायोप्सी आणि त्यासोबत येणारे धोके या पद्धतीमुळे टाळता येणार आहेत. नजीकच्या भविष्यकाळात एक साधीशी, कमी खर्चाची रक्ततपासणी कर्करोगाचे विश्वासार्ह पद्धतीने निदान करण्यासाठी, ते देखील कुठलीही लक्षणं दिसण्याच्या आधीच, पुरेशी ठरणार आहे.
या संशोधनात १६,१३४ जण सहभागी झाले. त्यापैकी ५,५०९ व्यक्ती कर्करुग्ण होत्या (ट्रुब्लड स्टडी), तर १०,६२५ जणांमध्ये कर्करोगाची कुठलीही लक्षणे नव्हती (रेझोल्यूट स्टडी). ही तपासणी ९४ टक्क्यांपेक्षाही अधिक अचूक असल्याचे स्पष्ट झाले.कर्करोगाचे लवकर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु प्रभावी व विश्वासार्ह तपासणी पद्धतीच्या अभावामुळे हे काम तितकेच आव्हानात्मक देखील आहे. सध्या व्यावसायिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या बहुसंख्य चाचण्या या इन्व्हेजिव आणि महागड्या आहेत. ( हे पण वाचा-शरीरातल्या 'या' अवयवांशिवायही अगदी व्यवस्थित जगू शकतो माणूस)
त्याचप्रमाणे, मॅमोग्रॅम्स आणि लो-डोस सीटी स्कॅन्स (एलडीसीटी) यांसारखे सध्या वापरल्या जाणाऱ्या कर्करोग तपासणी पद्धतीत रेडिएशनचा धोका असतो, कोलोनोस्कोपी इन्व्हेजिव पद्धत आहे, रक्ताधारित मार्कर्स हे संदिग्ध आहेत, तर सर्वसाधारण शस्त्रक्रिया प्रक्रियेत जे धोके असतात, ते टिश्यू बायोप्सीमध्येही असतात. ( हे पण वाचा- पेनकिलरच्या सेवनाने होऊ शकतात 'या' गंभीर समस्या, वाचा कोणत्या)