अरेरे! हँगओव्हर समजून दुर्लक्ष करणं पडलं महागात; महिलेला झाला जीवघेणा आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 03:53 PM2023-12-13T15:53:08+5:302023-12-13T16:03:48+5:30
रात्री पार्टी केल्यानंतर तिला उलट्या झाल्यासारखे वाटले. त्याचवेळी नाकावर आणि चेहऱ्यावर लाल पुरळ उठले. पण तिने सुरुवातीला सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.
न्यूझीलंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पॉपी बेगुएली नावाच्या महिलेची तब्येत अचानक बिघडू लागली. रात्री पार्टी केल्यानंतर तिला उलट्या झाल्यासारखं वाटलं. त्याचवेळी तिच्या नाकावर आणि चेहऱ्यावर लाल पुरळ उठले. पण तिने सुरुवातीला सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. रात्री पार्टी केल्याने आणि जास्त मद्यपान केल्यामुळे अंगावर पुरळ उठत असल्याचा विचार करून ती त्याकडे दुर्लक्ष करत होती. मात्र जेव्हा खोकल्यानंतर रक्त येऊ लागले तेव्हा परिस्थिती आणखी बिघडू लागली.
खोकल्याबरोबर रक्त येत असल्याचे पाहून ती सुरुवातीला थोडी घाबरली. जेव्हा ती डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेली तेव्हा तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला आणि डॉक्टरांनी तिला कॅन्सर झाल्याचं सांगितलं. यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. टेस्ट केल्यानंतर महिलेला 'हॉजकिन लिम्फोमा' झाल्याचं समोर आलं आहे.
हॉजकिन लिम्फोमा हा एक प्रकारचा कॅन्सर आहे जो बोन मॅरोमध्ये होतो. जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा कॅन्सर लिम्फोसाइट्स नावाच्या पांढऱ्या रक्त पेशींवर परिणाम करतो. हॉजकिनच्या लिम्फोमामध्ये, लिम्फ नोड्समध्ये असामान्य लिम्फोसाइट्स (रीड-स्टर्नबर्ग पेशी) तयार होतात. या आजाराचे निदान सामान्यत: टेस्ट करून केलं जातं.
थकवा, अचानक वजन कमी होणे, ताप, रात्री घाम येणे, खाज सुटणे ही हॉजकिन्स लिम्फोमाची लक्षणं आहेत. पॉपी बेगुएली सांगते की, कॅन्सरचं निदान होण्यापूर्वी मित्रांसोबत पार्टी करायची आणि भरपूर दारू प्यायची. थोडी डोकेदुखी होती पण काही वेळाने बरं वाटलं. मग अचानक माझ्या लक्षात आलं की माझी तब्येत बिघडत आहे आणि प्रत्येक वेळी रात्री मला उलट्या झाल्यासारखे वाटू लागलं. माझ्या संपूर्ण शरीरावर ऍलर्जी झाल्यासारखे वाटलं.
सुरुवातीला डॉक्टरांनी या लक्षणांवर एक्जिमा आणि त्वचारोग म्हणून उपचार केले आणि औषध लिहून दिलं. चुकीच्या औषधामुळे आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरं जावं लागलं. पुरळ दिवसेंदिवस वाढत गेले आणि माझा चेहरा पूर्णपणे खराब झाला. यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या शरीरात दिसणारी लक्षणे कॅन्सरची लक्षणं आहेत. आता उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.