फक्त तरुणच नव्हे, तरुणींमध्येही चढतेय अति व्यायामाची नशा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 05:50 PM2017-11-21T17:50:54+5:302017-11-21T17:52:28+5:30
‘पी हळद अन् हो गोरी!’, या प्रकारात आरोग्याचे वाजतात तीन-तेरा!
- मयूर पठाडे
फक्त तरुण आणि त्यातही मुलंच व्यायाम करतात, त्यातल्या अनेकांना व्यायामाची ‘नशा’ असते असं नाही. बारीक, सडपातळ होण्याच्या आणि वेट लॉस करण्याच्या हव्यासापोटी अनेक तरुणी आणि महिलाही आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करतात. लवकरात लवकर आपली फिगर मेन्टेन करणं हा सोस तर त्यामागे असतोच, पण त्यामुळेच आपण सुंदर दिसतो असंही त्यांना वाटत असतं.
स्त्री असो वा पुरुष, अतिरेकी व्यायामाचा सगळ्यात पहिला फटका बसतो तो हृदयावर. त्यामुळे हृदयावर अतिरेकी ताण येतो. कित्येकदा हा ताण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त असतो आणि त्याचा दुष्परिणाम थेट अकस्मात मृत्यूतही होऊ शकतो.
त्यातही समजा तुम्ही खूप व्यायाम करताहात, पण तुमचा आहार जर कमी असला, कॅलरी इनटेक खूपचं कमी असलं तर त्याचा आणखीच वाईट परिणाम होतो. विशेषत: स्त्रियांमध्ये दुहेरी दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतात. म्हणजे एकीकडे खूप व्यायाम करायचा आणि दुसरीकडे डाएट करायचा, आपलं वजन मिलिग्रॅमनंही वाढू नये याबाबत अतिरेकी दक्षता घ्यायची, त्यामुळे दुखणी विकोपाला जाऊ शकतात आणि आपल्या आरोग्याचे तीन-तेरा वाजू शकतात.
जेव्हा सातत्यानं तुम्हाला दुखणं जाणवत असेल, गरजेपेक्षा जास्त काळ आणि जास्त प्रमाणात तुमचं अंग दुखत असेल, तर तिथे थोडा वेळ थांबा आणि विचार करा. आपल्या वर्कआऊट रुटिनचं विश्लेषण करा. कदाचित तुम्ही जरा ‘अति’च करत असाल.
अनेक तरुणींना तर याचं इतकं आॅब्सेशन चढतं की ‘पी हळद अन् हो गोरी!’
कमी काळात जास्तीत जास्त व्यायामाचा सपाटा त्या लावतात आणि आपल्या आरोग्याचं वाटोळं करून घेतात. अति व्ययामामुळे दुखापतींचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढतं.
अति व्यायामामुळे तरुणी आणि महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचा बॅलन्स बिघडतो.
त्यांच्या मासिक पाळीचं चक्र बिघडतं.
कधी कधी मासिक पाळीचं हे चक्र बंदही पडू शकतं.
अकालीच हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढतं.
प्रचंड प्रमाणात थकवा जाणतो आणि शरीरातील एनर्जीही कमी होते.