हार्टलाच नव्हे, ब्रेनलाही येतोय अटॅक, लक्षणांकडे दुर्लक्ष नको; संतुलित आहार आणि व्यायाम हवा!
By संतोष हिरेमठ | Published: October 29, 2023 12:53 PM2023-10-29T12:53:35+5:302023-10-29T12:54:45+5:30
आज, २९ ऑक्टोबरला ‘जागतिक पक्षाघात दिन’ पाळला जातो
संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: अटॅक म्हटले तर हार्ट अटॅकच अनेकांना माहीत आहे. मात्र, ज्याप्रमाणे हृदयाला झटका येतो, तसाच ब्रेनला म्हणजे मेंदूलाही झटका येतो. वैद्यकीय भाषेत याला ‘सिरेब्राे व्हस्क्युलर ॲक्सिडेंट’ म्हणजे पक्षाघात असे म्हटले जाते. एकट्या ‘घाटी’त महिन्याला पक्षाघाताचे १०० च्या घरात, तर मेंदूत रक्तस्रावाचे जवळपास ४० रुग्ण येतात. याबद्दल जनजागृतीसाठी दरवर्षी जगभरात २९ ऑक्टोबरला ‘जागतिक पक्षाघात दिन’ पाळला जातो.
पक्षाघाताची लक्षणे काय?
- काही वेळा हात, पाय लुळा पडण्याचा प्रकार होतो.
- चेहरा एका बाजूला पडणे, हेदेखील पक्षाघाताचेच एक लक्षण आहे. बाेलताना जीभ अडखळणे, बोलता न येणे हेही पक्षाघाताचे लक्षण आहे.
- शरीराचा अचानक तोल जाणे, संतुलन हरवणे हेही एक लक्षण सांगितले जाते.
(जागतिक पक्षाघात दिन)
३० टक्के रुग्णांचा आजार आपोआप बरा३० टक्के रुग्णांचा आजार हा आपोआपच बरा होत असतो. पक्षाघाताच्या रुग्णासाठी ३ तास ४० मिनिटे हा ‘गोल्डन अवर’ मानला जातो. यादरम्यान उपचार घेतल्यास तो बरा होऊ शकतो.
- डाॅ. जीवन राजपूत, मेंदूविकारतज्ज्ञ
आजार टाळू शकतो
पक्षाघात टाळता येऊ शकतो. त्यासाठी संतुलित आहार व व्यायाम महत्त्वाचा आहे.
- डॉ. मकरंद कांजाळकर, न्यूरोफिजिशियन
९० टक्के रुग्ण होऊ शकतात बरे
चारपैकी एकाला स्ट्रोकचा धोका असतो. योग्य काळजी, खबरदारी घेतली, वेळीच योग्य उपचार घेतला तर ९० टक्के रुग्ण बरे होऊ शकतात.
- डाॅ. पांडुरंग वट्टमवार, पक्षाघाततज्ज्ञ