आता डेंग्यू-चिकनगुनियासारख्या जीवघेण्या आजारांसाठी मिळणार विमा संरक्षण; असा होईल फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 07:33 PM2020-11-25T19:33:08+5:302020-11-25T19:40:15+5:30
insurance : डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे प्रमुख व्हेक्टर जनित आजार आहेत.
नवी दिल्ली: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) आता व्हेक्टर जनित (डास, माश्यांपासून फैलावणारे आजार) आजारांसाठी विमा पॉलिसी आणण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार केल्यानंतर भागधारकांकडूनही सूचना मागविण्यात आल्या आहेत.
डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे प्रमुख व्हेक्टर जनित आजार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) गेल्या वर्षीच्या अहवालानुसार, संक्रमणाच्या आजारांमध्ये व्हेक्टर जनित आजार हे 17 टक्के आहेत आणि यामुळे वर्षाला 7 लाखांहून अधिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पॉलिसीअंतर्गत एक वर्षाचा विमा
आयआरडीएच्या या आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत तुम्हाला डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांवर एक वर्षाचा विमा मिळू शकेल. सध्या तयार केलेल्या प्रस्तावानुसार या प्रोडक्टला एक वर्षाच्या कालावधीसाठी जारी केले जाऊ शकते. यामध्ये वेटिंग पीरियड (प्रतीक्षा कालावधी) 15 दिवसांचा असेल. या विमा पॉलिसीमध्ये डेंग्यू, मलेरिया, फाइलेरिया, ब्लॅक-अझर, चिकनगुनिया, जपानी एन्सेफलायटीस आणि झिका व्हायरससारख्या व्हेक्टर जनित आजारांचा समावेश असेल.
प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसार, या प्रोडक्टचे नाव व्हेक्टर बॉर्न डिसीज हेल्थ पॉलिसी असेल. हे एक 'सिंगल प्रीमियम' प्रोडक्ट असेल. म्हणजेच फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. या प्रीमियम प्रोडक्टसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
...म्हणून गरजेचा आहे आरोग्य विमा
व्हेक्टर जनित आजार लक्षात घेऊन आम्ही येत्या काळात ग्राहकांना मदत करण्याचा प्रयत्न करू. भारतातील डेंग्यू, मलेरिया यासारख्या व्हेक्टर जनित आजारामुळे बरेच लोक बाधित आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो. या आजारांवर उपचार न मिळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पैशांची कमतरता असणे आहे. त्यामुळे अशा आजारांच्या उपचारासाठी आरोग्य विमा मिळविणे फार महत्वाचे आहे, असे पॉलिसी बाजारचे आरोग्य विमा प्रमुख अमित छाबरा यांनी सांगितले.