Coronavirus: 'या' रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा कमी धोका; दोन अभ्यासांचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 08:00 AM2020-10-17T08:00:37+5:302020-10-17T08:00:47+5:30
४ लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी
वॉशिंग्टन : ओ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो, असे दोन अभ्यासातून आढळले आहे. ओ रक्तगटाच्या लोकांना कोरोना बाधा झालीच तरी त्याचा त्यांच्या अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही कमी असते, असे या निष्कर्षात म्हटले आहे.
ब्लड अॅडव्हान्सेस नियतकालिकामध्ये या दोन पाहणींवर आधारित लेख प्रसिद्ध झाला असून त्यात ही माहिती आहे. पहिल्या पाहणीत कोरोना चाचणी झालेल्या ४ लाख ७३ हजार लोकांची माहिती गोळा करण्यात आली. त्यात कोरोनाची बाधा झालेल्या लोकांमध्ये ओ रक्तगटाचे खूप कमी लोक होते. ए, बी, एबी या रक्तगटाच्या लोकांची संख्या अधिक होती. ओ रक्तगटाच्या लोकांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका कमी का आहे या बाबीवर आणखी संशोधन व्हायला पाहिजे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
रेमडेसिवीरने रुग्ण लवकर बरा होत नाही?
रेमडेसिवीर औषधामुळे रुग्ण लवकर बरा होत नाही तसेच या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही कमी झालेले नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीचा २८ दिवस अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना रेमडेसिवीर औषध देण्यात आले होते.