स्थूल व्यक्तींमध्ये स्लीप ॲप्नियाचे २० टक्के प्रमाण; घोरणाऱ्या व्यक्तीला होतो आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:43 AM2022-02-17T10:43:58+5:302022-02-17T10:44:21+5:30
रात्री श्वास घेताना सतत त्रास होतो. हा आजार वृद्ध पुरुषांमध्ये आढळतो. रजोनिवृत्तीनंतर महिलांना हा आजार होण्याची शक्यता वाढते.
मुंबई : घोरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्लीप ॲप्निया आजार असतो असे नाही. मात्र सामान्य वजन असलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण तीन टक्के, तर स्थूल व्यक्तींमध्ये हे प्रमाण वीस टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.
ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांचे निधन ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियाने झाले. यानिमित्ताने आजाराविषयी अधिक माहिती देताना तज्ज्ञ डॉ. प्रशांत छाजेद म्हणाले की, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया किंवा ओएसए हा आजार झोपेदरम्यान वरच्या श्वसननलिकेमध्ये वारंवार येणाऱ्या अडथळ्यामुळे होतो. हा झोपेशी संबंधित श्वसनविषयक आजार आहे. जीभ, घसा यामधील मऊ ऊती व टाळूला आधार देणारे स्नायू शिथिल होतात. रात्री श्वास घेताना सतत त्रास होतो. हा आजार वृद्ध पुरुषांमध्ये आढळतो. रजोनिवृत्तीनंतर महिलांना हा आजार होण्याची शक्यता वाढते.
जीवनशैलीत बदल गरजेचे
वेळेवर निदान किंवा उपचार झाला नाही तर आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात. या आजाराच्या सौम्य केसेससाठी उपचाराकरिता जीवनशैलीमध्ये बदल पुरेसे ठरू शकतात. यात व्यायाम, वजन कमी करणे आणि पुरेशी झोप घेणे. विशेषत: झोपण्यापूर्वी मद्यपान, ॲण्टिॲन्क्झायटी औषधे व इतर शामक पदार्थ टाळणे गरजेचे आहे. मध्यम ते गंभीर स्लीप ॲप्नियाचे पीडित व्यक्तींसाठी विविध उपचार आहेत. आजाराच्या निदानासाठी रात्रभर पॉलिसोमेनोग्राफी चाचणी केली जाते.
काय होतो त्रास?
या आजाराचे अनेक प्रकार आहेत, पण यात सर्वात महत्वाचा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया हा आहे. यात घशातील स्नायू अधूनमधून शिथिल होतात आणि झोपेत श्वसननलिकेमध्ये अडथळा होतो. जोरजोरात घोरणे, झोपेदरम्यान धाप लागणे, जाग आल्यानंतर तोंड कोरडे असणे, सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी व निद्रानाश ही लक्षणे आहेत, अशी माहिती स्लीप मेडिसीन तज्ज्ञ. अंशू पंजाबी यांनी दिली आहे.