वाढलेली चरबी तुमची स्मरणशक्ती अन् विचार करण्याची क्षमता कमी करु शकते, संशोधनात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:30 PM2022-03-03T17:30:11+5:302022-03-03T17:32:34+5:30

शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे माणसाची विचारशक्ती आणि स्मरणशक्ती धोक्यात येऊ शकते का? याबाबत नुकताच एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, जास्त वजनामुळे विशेषत: प्रौढांमध्ये विचारशक्ती आणि स्मरणशक्ती धोक्यात येऊ शकतात.

obesity can affect your thinking and memory, says study | वाढलेली चरबी तुमची स्मरणशक्ती अन् विचार करण्याची क्षमता कमी करु शकते, संशोधनात दावा

वाढलेली चरबी तुमची स्मरणशक्ती अन् विचार करण्याची क्षमता कमी करु शकते, संशोधनात दावा

Next

जर वजन वाढलं (Weight gain Problem) तर ते कमी करण्यासाठी लोकांना बराच काळ संघर्ष करावा लागतो. बरेच लोक असे आहेत, जे लठ्ठपणातून (Obesity) मुक्त होण्यासाठी खाण-पिणंदेखील सोडून देतात. पण योग्य आहार (Proper Diet), व्यायाम (Exercise) यांचं नियोजन केल्यास वजन (Weight loss), अतिरिक्त चरबी (Fat Loss) कमी केली जाऊ शकते. अर्थात शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे आरोग्याच्या दृष्टीने विविध समस्या सुद्धा उद्भवतात. व्यक्तीची विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीदेखील धोक्यात येऊ शकते.

शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे माणसाची विचारशक्ती आणि स्मरणशक्ती धोक्यात येऊ शकते का? याबाबत नुकताच एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, जास्त वजनामुळे विशेषत: प्रौढांमध्ये विचारशक्ती आणि स्मरणशक्ती धोक्यात येऊ शकतात. म्हणजे अतिरिक्त वजनामुळे या क्षमता क्षीण होऊ शकतात. जेव्हा संशोधकांनी हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी जोखीम घटक (उदा : डायबेटिस किंवा हाय ब्लडप्रेशर) किंवा रक्तवहिन्यासंबंधी मेंदूच्या दुखापतींचा अभ्यास केला, तेव्हा विचार आणि स्मरणशक्ती यासारख्या घटकांवर शरीरातील अतिरिक्त चरबीचा प्रभाव पडत असल्याचं समोर आलं. हा अभ्यास 'जामा नेटवर्क ओपन' जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. बायोइलेक्ट्रिकल प्रतिबाधा विश्लेषणाद्वारे (Bioelectrical Impedance Analysis) या अभ्यासात एकूण ९ हजार १६६ सहभागींच्या शरीरातील चरबीचं मूल्यांकन केलं गेलं आहे. लाइव्ह हिंदूस्तानने याबाबत वृत्त दिलंय.

कसा करण्यात आला अभ्यास?
एरिक स्मिथ हे एक न्यूरोलॉजिस्ट, शास्त्रज्ञ आणि कॅल्गरी विद्यापीठातील क्लिनिकल न्यूरोसायन्सचे सहयोगी प्राध्यापक असून या शोधनिबंधाचे सहलेखक आहेत. ते म्हणाले की 'संवेदनशीलतेशी संबंधित कार्य जतन करणं हा वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे. हा अभ्यास स्पष्ट करतो की, चांगलं पोषण आणि शारीरिक क्रियाशीलता, योग्य वजन आणि शरीरातील चरबीची संतुलित टक्केवारी स्मृतिभ्रंश रोखते.'

कॅनेडियन अलायन्स फॉर हेल्दी हार्ट्स अँड माइंड्स (CAHHM) आणि प्युअर माइंड स्टडी या दोन ब्रेन कोअर लॅबचे स्मिथ हे प्रमुख आहेत. या दोन्ही लॅबमध्ये हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासासाठी सहभागी करून घेण्यात आलेल्या सहभागींचे वय 30 ते 75 पर्यंत होते, त्यांचे सरासरी वय सुमारे 58 वर्षे होते. या सहभागींपैकी 56 टक्क्यांहून अधिक महिला कॅनडा किंवा पोलंडमध्ये राहत होत्या. यापैकी बहुतेक श्वेत युरोपियन वंशाचे होते, तर सुमारे 16 टक्के इतर वांशिक पार्श्वभूमीचे होते. या अभ्यासात हृदयरोग असलेल्या व्यक्तींना वेगळे ठेवण्यात आलं होतं.

चरबी कमी केल्याने काय होईल फायदा?
अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी ६ हजार ७३३ चे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) करण्यात आले. आतड्यांच्या आसपासची पोटातील चरबी मोजण्यासाठी हा एमआरआय केला गेला. तसेच मेंदूला कमी झालेल्या रक्त पुरवठ्यामुळे प्रभावित मेंदूच्या क्षेत्रामध्ये रक्तवाहिन्यासंबंधी दुखापतीचंदेखील मूल्यांकन एमआरआरने करण्यात आले.

शोध निबंध लिहिणारे मॅक मास्टर विद्यापीठाचे मायकेल जी. डेग्रोट स्कूल ऑफ मेडिसिनमधील मेडिसिनच्या (एचएचएस) प्राध्यापक आणि हॅमिल्टन हेल्थ सायन्सेसमधील रक्तवहिन्यासंबंधी औषध विशेषज्ञ सोनिया आनंद यांनी सांगितले, 'आमचे निष्कर्ष सूचित करतात की शरीरातील जास्त चरबी कमी केल्याने संवेदनशीलतेशी संबंधित कार्य टिकवून ठेवता येतं.' त्यांनी पुढे सांगितलं की, 'डायबेटिस, उच्च रक्तदाब, तसंच रक्तवहिन्यासंबंधी मेंदूला दुखापत यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखमीच्या घटकांमध्ये वाढ झाल्यानंतरही शरीरातील अतिरिक्त चरबीचा प्रभाव कायम राहतो.'

शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ही चरबी कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, व्यायाम करणं फायद्याचं ठरू शकतं.

Web Title: obesity can affect your thinking and memory, says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.