आता केवळ ‘बीएमआय’वर लठ्ठपणा ठरवता येणार नाही; जाणून घ्या नवीन मार्गदर्शक तत्त्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:20 AM2023-12-28T10:20:27+5:302023-12-28T10:20:59+5:30
आजपर्यंत देशात एखाद्या व्यक्तीची लठ्ठपणाची व्याख्या ही त्याच्या ‘बीएमआय’वर (उंची आणि वजनाचं गुणोत्तर) ठरत होती.
मुंबई : आजपर्यंत देशात एखाद्या व्यक्तीची लठ्ठपणाची व्याख्या ही त्याच्या ‘बीएमआय’वर (उंची आणि वजनाचं गुणोत्तर) ठरत होती. त्याच्या आधारावरच लठ्ठपणावर उपचार दिले जायचे. मात्र, जगभरातील लठ्ठपणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करून विविध शाखेच्या डॉक्टरांनी लठ्ठपणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करून त्यावरील शोधनिबंध वैद्यकीय विश्वातील प्रतिष्ठेच्या जर्नल असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियामध्ये नुकताच प्रसिद्ध केला आहे.
लठ्ठपणा केवळ ‘बीएमआय’वर आधारित नसल्याचे नमूद केले आहे. तसेच नवीन मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करण्यात आली आहे. थोडक्यात लठ्ठपणामुळे होणारे आजार आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम याचा विचार करण्यात येणार आहे.
हा शोधनिबंध तयार करण्याकरिता डायबेटॉलॉजिस्ट, एंडोक्रायनोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, बॅरियाट्रिक सर्जन आणि गायनॅकॉलॉजिस्ट तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता.
२० ते ६९ वर्षे वयोगटातील भारतीय प्रौढांमध्ये २०२४ पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हा शोधनिबंध लिहिणाऱ्यांपैकी बॅरियाट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी सांगितले की, ‘हा शोधनिबंध तयार करण्यासाठी या देशातील व्यक्तींचा अभ्यास करण्यासोबत आम्ही जगभरातील लठ्ठपणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास केला. त्यानुसार केवळ लठ्ठपणाच्या उपचारासाठी बीएमआय हा आधार ठरू शकत नाही. अनेकवेळा काही व्यक्तींना ज्या विविध आजारांना सामोरे जावे लागते, त्याचे मूळ कारण हे लठ्ठपणा असतो. तर त्या व्यक्तीला लठ्ठपणावर तत्काळ उपचार केले पाहिजे. त्यावेळी त्या व्यक्तीचा बीएमआय बघता कामा नये. थोडक्यात लठ्ठपणामुळे होणारे आजार आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम याचा विचार करण्यात येणार आहे.’
बीएमआय म्हणजे काय?
आपल्या शरीरातील वजन नियंत्रणात आहे की नाही, यासाठी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) मोजला जात. यामध्ये शरीराची उंची आणि वजनाचं गुणोत्तर याला बीएमआय मोजणे, असे म्हणतात.
बीएमआयमुळे शरीराचं वजन तुमच्या उंचीच्या तुलनेत बरोबर आहे की नाही, याची आपल्याला माहिती मिळते. विशेष म्हणजे, आपल्या दिशा मिळते.
सर्व साधारणपणे १८.५ ते २४.५च्या दरम्यान बीएमआय असावा. त्यापेक्षा २५ पेक्षा अधिक असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच जर बीएमआय ३० पेक्षा अधिक असेल तर लठ्ठपणाची सुरुवात आहे. त्यांनी त्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत.