लठ्ठपणा हृदयविकाराचा शत्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:22 PM2019-01-24T22:22:29+5:302019-01-24T22:34:02+5:30

लठ्ठपणा आज सुखी पाश्चिमात्य समाजात एक समस्या बनली आहे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या लठ्ठपणाचा आणि बऱ्याच आजारांचा संबंध आहे. कुटुंबात लठ्ठ व्यक्ती असणे हीदेखील काळजीची बाब बनली आहे. शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ जमा होऊन शरीर हे रोगांचे घर बनते. नुसते शारीरिक वजन वाढण्यालाच सर्वसाधारण लठ्ठपणा मानले जाते. माणसाच्या उंची आणि वयाच्या प्रमाणात २० टक्क्यांपेक्षा जास्त वजन असणे धोक्याचे आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकार असणाऱ्यामध्ये लठ्ठपणा हा अधिक गंभीर मानला जातो.

Obesity is the enemy of heart attack | लठ्ठपणा हृदयविकाराचा शत्रू

लठ्ठपणा हृदयविकाराचा शत्रू

googlenewsNext
ठळक मुद्देमाणसाच्या उंची आणि वयाच्या प्रमाणात २० टक्क्यांपेक्षा जास्त वजन असणे धोक्याचेमन समाधानी व संतुलित विचारांचे असणे हेच निरोगी शरीराचे गूढ सत्य

लठ्ठपणा आज सुखी पाश्चिमात्य समाजात एक समस्या बनली आहे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या लठ्ठपणाचा आणि बऱ्याच आजारांचा संबंध आहे. कुटुंबात लठ्ठ व्यक्ती असणे हीदेखील काळजीची बाब बनली आहे. शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ जमा होऊन शरीर हे रोगांचे घर बनते. नुसते शारीरिक वजन वाढण्यालाच सर्वसाधारण लठ्ठपणा मानले जाते. माणसाच्या उंची आणि वयाच्या प्रमाणात २० टक्क्यांपेक्षा जास्त वजन असणे धोक्याचे आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकार असणाऱ्यामध्ये लठ्ठपणा हा अधिक गंभीर मानला जातो. सामाजिक आर्थिकता व जाती याचा लठ्ठपणावर निश्चितच असर होतो. कित्येक कुटुंबात लठ्ठपणा हा आनुवंशिक असतो. वाढलेल्या चरबीचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्यावर ही चरबी फॅट सेल (चरबी पेशी) यामध्ये जमा होते. लठ्ठपणा जसजसा वाढेल तसतसा चरबीच्या पेशीचा आकारही वाढतो. शरीरातल्या कुठल्याही भागात चरबी जमा होऊ शकते. लठ्ठपणा मोजण्यासाठी विविध पद्धती अवलंबिल्या जातात. शरीरातील चरबीचे वजन (डेन्सीटोमेट्री), अण्डर वाटर वजन, शरीरातील एकूण पाण्याचे प्रमाण निश्चित करते, एकूण पोटॅशियम वा चरबी सेलचे प्रमाण आदीवरून लठ्ठपणाची पायरी ठरविता येते. शरीरातील चरबीच्या पेशींचे प्रमाण अप्रत्यक्षरीत्या कुठलेही यंत्र न वापरता साध्या सोप्या पद्धतीने मोजता येते.
१) वजन व उंची : वजन, उंची व वय यांचे अंतर्गत एक निश्चित संबंध आहेत. आयुर्विमा महामंडळाने निश्चित छापील तक्त्याद्वारे वजन मोजता येते. दिसायला लठ्ठ दिसणे अथवा स्नायूत चरबी जमा होणे हे काही लठ्ठपणाचे लक्षण नव्हे.
२) चामडीची जाडी मोजणे : कॅलिपरद्वारे हात आणि कमरेच्या स्नायूंचे मोजमाप करून नोमोग्रामच्या साहाय्याने शरीरातील चरबीचे निश्चित प्रमाण कळू शकते.
३) कमरेच्या व मांडीच्या जाडीचे मोजमाप टेपने करता येते. कमरेचे व मांडीच्या जाडीचे अंतर्गत प्रमाण हे हृदयरोग, अर्धांगवायू व मृत्यूची चेतावणी देते. पुरुषांत हे प्रमाण एकपेक्षा जास्त असणे धोकादायक आहे व स्रियांमध्ये ०.८ पेक्षा जास्त प्रमाण घातक ठरते.
लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत. त्यापैकी जास्त कॅलरीजयुक्त खाद्यपदार्थ घेणे व कमी हालचालीचे शारीरिक काम करणे आद्य कारण आहे. लठ्ठ माणसात एकूण चरबी पेशींची संख्या वाढलेली असते अथवा त्यांचा आकार वाढलेला असतो. दुसऱ्या प्रकारच्या लठ्ठपणात कमरेच्या भागात लठ्ठपणा वाढतो ज्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार (रक्ताच्या वाहिनीमुळे) होण्याची संभावना अधिक असते. लहान वयात दिसून येणारा लठ्ठपणा हा वयोमानाने वाढत राहतो व प्रौढावस्थेत जास्त असतो पाहिजे त्या प्रमाणाबाहेर स्निग्ध पदार्थाचे सेवन केल्याने वाढते वजन वाढतच राहते त्यामुळे चरबीच्या पेशींची संख्याही वाढते व लठ्ठपणा अधिकच जाणवतो.
वाढत्या वयाप्रमाणे वाढणारा लठ्ठपणा हा शरीराच्या मध्यात जाणवतो. गर्भवती महिलेत वाढणारे वजन हे वाढत्या गर्भामुळे असते. तारुण्यात आळस व बैठकीचे काम वजन वाढून लठ्ठपणा वाढण्यास मदत करतात. खाणेपिणे व स्वस्थ बसून राहणे यापेक्षा अनेक आजारांमुळे शारीरिक वजन वाढून लठ्ठपणा येतो.
१) मेंदूतील हायपोथॅलमसच्या दुखापतीमुळे वजन वाढते.
२) गलगंड म्हणजे थायरॉईड ग्रंथीत आयोडिनचे प्रमाण कमी पडल्याने मान, पोट आणि कमरेच्या भागात लठ्ठपणा जाणवतो.
३) कुशिंग सिन्ड्रोम या आजारात हात व पाय सोडून इतर ठिकाणी लठ्ठपणा वाढतो. ४) पॉलिसिस्टिक ओव्हरी सिण्ड्रोम या रोगात स्रियांना पाळी अनियमित येते अथवा मासिक पाळी बंद होते, शरीरावर केस जास्त प्रमाणात येतात, लठ्ठपणा वाढून नपुंसकता येण्याची शक्यता असते. ५) जेनेटीक सिण्ड्रोममध्ये लठ्ठपणाबरोबर प्रजोत्पादन अवयव कमजोर होतात, उंची खुटते, मतिमंदपणा येतो व जास्त उलट्या होण्याचे प्रमाण वाढते. ६) औषधांमुळेही लठ्ठपणा वाढतो. उदा. स्टिरॉईडच्या गोळ्या अथवा इंजक्शने जी अति गंभीर रुग्णांना देणे हितकारक असते ती सर्वसाधारण आजार असलेल्यांना दिली जातात, ही व मनोरुग्णास देण्यात येणारी औषधे यामुळे लठ्ठपणा वाढतो जो टाळता येऊ शकतो.
माणसाची मानसिकता व लठ्ठपणाचाही संबंध आहे. जास्त कॅलरीज खाऊन कमी मेहनतीचे काम करणेही लठ्ठपणाला आमंत्रण देते. वातावरणाने माणसाच्या स्वभावात बदल होऊन तो जोशाने, आनंदाने जास्त जेवण करतो. लहानपणी मुलांना कुठल्या पदार्थांपासून वंचित ठेवल्याने मोठे झाल्यावर ते जास्त खाण्याच्या सवयीत परिवर्तन होते. लठ्ठपणा तसा शरीराला विविध कारणांनी त्रासदायक ठरणारा असतो. रक्तदाब वाढणे, चरबीच्या गाठी हृदयाच्या व इतर रक्तवाहिन्यात नसल्याने त्यात रोध निर्माण होणे (अथरोस्केलेरोसीस), मधुमेह, दमा, यकृताचे आजार, पित्ताशयाचे आजार, संधिवात आदी व्याधी लठ्ठपणा बळावतात व वाढवतात ही लठ्ठपणाची वाईट परिणामांची जाणीव करून देणारी लक्षणे आहेत.
लठ्ठपणा इलाज : कमी खाणे (कॅलरीज कमी घेणे), व्यायाम करणे आणि कमी केलेले वजन स्थिर ठेवणे या तीन सूत्री कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करणे हेच लठ्ठपणा कमी करण्याचे प्रमुख सूत्र आहे. कमीत कमीपासून मध्यम लठ्ठपणा हा कमी कॅलरीज बरोबर नियमित व्यायाम केल्याने कमी होतो. यासाठी केवळ चालणे हा व्यायाम पुरेसा आहे. एका मिनिटात ४ किलो कॅलरीज वजन घटते व त्यापेक्षा अधिक व्यायामाने ७ ते १० किलो कॅलरीज वजन घटते. एक किलो वजन घटविण्यासाठी निगेटिव्ह बॅलन्स कमीत कमी ७५०० किलो कॅलरीज असणे आवश्यक आहे.
आहारतज्ज्ञ तर अनेक प्रकारच्या आहाराची शिफारस व्यक्तीच्या लठ्ठपणानुसार करतात. यात संपूर्ण उपवासापासून कमी कॅलरीजच्या आहाराचा समावेश आहे. वजन जास्त गतीने घटविल्यास डोके दुखणे, पोटाचे वा आतड्याचे विकार, थकवा, अनियमित हृदयाचे ठोके किंवा मृत्यू ओढवू शकतो. संतुलित प्रमाणात वजन घटविणे हिताचे ठरते. जीवनसत्त्वे, प्रथिने व कार्बोहायड्रेट व क्षार यांचे प्रमाण आहारात असणे महत्त्वाचे आहे.
परंतु मानवी सवयीप्रमाणे माणूस थोडेसे वजन घटले की पूर्ववत जास्त खाऊ लागतो व लठ्ठपणा कमी झालेला पुन्हा वाढतो, लठ्ठपणा कमी करण्यासाठी लठ्ठ व्यक्तीला त्याच्या संपूर्ण परिवार सदस्यांचे सहकार्य, सहयोग व मार्गदर्शन लाभणे गरजेचे आहे. सुरुवातीस भूक कमी करण्याच्या औषधांचा वापरही कमी पडतो.
वजन व उंचीच्या प्रमाणाच्या १०० टक्के लठ्ठपणा असणाºयांवर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. इतर उपाय कमी न पडल्यावर अथवा योग्य प्रतिसाद न मिळाल्यावर जास्तीची चरबी कापून टाकता येते. याचाच भाग म्हणून लहान आतड्याची बायपास शस्त्रक्रिया करून पचलेले अन्न शोषून घेण्याची आतड्यांची क्षमता घटवता येते. शेवटी माणसाच्या जठराची क्षमता कमी करण्यासाठी जठर कापून छोटे करण्याची शस्त्रक्रियाही केली जाते ज्यामुळे माणूस ठराविक मर्यादेपर्यंतच खाऊ शकतो. थोडेसे खाल्ले की लहान जठर भरते व माणूस जास्त न खाल्याचे वजन घटू लागते व लठ्ठपणा कमी होतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाच्या सवयी या मर्यादित असाव्यात. काम करून, घाम गाळून परिश्रमाने खाण्याची इच्छा असावी. आवश्यकतेपेक्षा जास्त न खाणे, नियमितपणे व्यायाम करणे याबरोबर चरबीयुक्त पदार्थ कमी खाणे हे लठ्ठपणा टाळण्यासाठी व कमी करण्यासाठी अति उपयुक्त आहे.
माणसाचे मन हे समाधानी व संतुलित विचारांचे असणे निरोगी शरीराचे गूढ सत्य आहे. लठ्ठपणा टाळा जेणेकरून हृदयविकार व उच्च रक्तदाब आपल्या नियंत्रणात राहून आपले आयुष्य वाढेल.

डॉ. रोहिदास वाघमारे, कार्डिओलॉजिस्ट, जे. जे. रुग्णालय, मुंबई.

 

Web Title: Obesity is the enemy of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.