धूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 12:15 PM2018-09-24T12:15:51+5:302018-09-24T13:02:01+5:30
संशोधकांनी केलेल्या अभ्यासाद्वारे कॅन्सरसंबंधीची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - आता धूम्रपानाऐवजी लठ्ठपणामुळे कॅन्सराचा धोका अधिक बळावू शकतो, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. रिसर्च यूकेच्या अहवालानुसार, बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आगामी काळात 25 वर्षांखालील स्त्रियांना कॅन्सर होण्यामागील मोठं कारण लठ्ठपणा ठरू शकेल. संशोधकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17 वर्षांच्या आतील महिलांनामध्ये जवळपास 23,000 प्रकरणांत लठ्ठपणामुळे तर 25,000 प्रकरणात धुम्रपानामुळे कॅन्सर रोग होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, दैनंदिन जीवनात जर हाच ट्रेंड राहिला, तर 2043पर्यंत महिलांना कॅन्सर होण्यामागील सर्वात मोठा धोका लठ्ठपणा ठरू शकते.
तसे पाहायला गेल्यास, पुरुषांसंबंधात ही आकडेवारी वेगळी आहे, कारण पुरुषांमध्ये धुम्रपानाचे प्रमाण अधिक असते आणि तंबाखुमुळे कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. दुसरीकडे, महिलांना कॅन्सर होण्याच्या प्रमुख कारणांबाबत चर्चा करायची झाली तर, धुम्रपान आणि लठ्ठपणा यामध्ये आता अधिक अंतर राहिलेले नाही. महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. 'कॅन्सर रिसर्च यूके'कडून कॅन्सर आणि लठ्ठपणासंबंधित लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एका मोहीमेचे आयोजन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार अधिक असलेले शरीराचे वजन यामुळे जवळपास 13 प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. यामध्ये स्तन, आतडे, किडनी यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. असे असूनही यूकेमध्ये 7 पैकी केवळ एका व्यक्तीला याबाबतची माहिती असते.
कॅन्सर रिसर्च यूके प्रिव्हेंशन एक्सपर्ट प्रोफेसर लिंडा बॉल्ड यांनी सांगितले की, लठ्ठपणा हा लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक मोठा धोका बनला आहे आणि यावर जर वेळीच उपाय केले नाही तर स्थिती अधिक भयंकर होऊ शकते. धुम्रपानाची सवय सोडवण्यासाठी सरकारकडून जनजागृतीसंबंधी कार्यक्रम राबवले गेले पाहिजे. शिवाय, रात्री 9 वाजण्यापूर्वी जंक फूडच्या जाहिराती आणि पौष्टिक नसलेल्या उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात यावी.
धुम्रपानाच्या तुलनेत लठ्ठपणामुळे कॅन्सरचा धोका अधिक बळावत असल्याचे अभ्यासाद्वारे निदर्शनास आले आहे. यामध्ये धुम्रपान करणाऱ्यांची संख्या पाहता लठ्ठ आणि अधिक वजन असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. धुम्रपानामुळे वर्षभरात 32,000 पुरुष आणि जवळपास 22,000 महिलांना कॅन्सरची लागण होते. तर लठ्ठपणा 5 टक्के पुरुष तर 7.5 टक्के महिला कॅन्सर रोगाला बळी पडतात, अशी आकडेवारी समोर आली आहे.