एनर्जी ड्रिंक्समुळे याच्या जिभेची झाली ही हालत, दिवसाला घेत होता ५ ते ६ ड्रिंक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 01:26 PM2019-03-28T13:26:23+5:302019-03-28T13:27:31+5:30
जगभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण एनर्जी ड्रिंकचं सेवन करतात. पण डॅन रॉयल्स नावाच्या व्यक्तीसाठी हे एखाद्या भयावह स्वप्नासारखंच ठरलं.
(Image Credit : dailymail.co.uk)
जगभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण एनर्जी ड्रिंकचं सेवन करतात. पण डॅन रॉयल्स नावाच्या व्यक्तीसाठी हे एखाद्या भयानक स्वप्नासारखंच ठरलं. डॅन हा शिक्षक आहे. त्याने नुकताच एक फोटो सोशल मीडियात शेअर केला असून त्यात त्याच्या जिभेवर जखमा दिसत आहेत. असे वाटत आहे की, त्याच्या जिभेची वरची त्वचा पूर्णपणे सोलली गेली आहे. डॅनने दावा केला आहे की, तो दिवसातून ५ ते ६ एनर्जी ड्रिंक सेवन करत होता आणि त्यामुळेच हे झालंय.
डॅनने फोटो शेअर करत त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे आणि इतरांनाही त्याने इशारा दिला आहे. डॅनने सांगितले की, तो दररोज ५ ते ६ एनर्जी ड्रिंक सेवन करत होता. त्यानंतर त्याच्या जिभेची ही अवस्था झाली. तेव्हा तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांनी त्याला सांगितले की, एनर्जी ड्रिंकमध्ये आढळणारे केमिकल्स आणि शुगरचं अधिक प्रमाण यामुळे हे झालंय. एनर्जी ड्रिंकच्या प्रत्येक कॅनमध्ये ५८ ग्रॅमपर्यंत शुगरचं प्रमाण असतं. त्यासोबतच अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन-बी आणि हर्बल पदार्थ असतात.
त्याच्यासोबत घडलेली घटना सांगतच त्यांने एनर्जी ड्रिंक सेवन करणाऱ्या लोकांनाही ते सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. डॅन रॉयल्स हा मुळचा ऑस्ट्रेलियन आहे. पण तो आशियामध्ये राहतो. त्याने हेही सांगितलं की, तो धुम्रपान करतो. मात्र डॉक्टरांचं हे स्पष्ट म्हणणं आहे की, जिभेला झालेल्या जखमा या एनर्जी ड्रिंकमुळे झाल्या आहेत.
डॉक्टर आणि डेन्टिस्टनी आधीही एनर्जी ड्रिंकबाबत इशारा दिला आहे. कारण या ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणाच कॅफीन आणि शुगर असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात शुगरचं प्रमाण अधिक असलेल्या ड्रिंक्समुळे दातांची समस्या अधिक वाढत आहे. त्यासोबतच कॅफीनच्या ओव्हर डोजमुळे पॅल्पिटेशन, हाय ब्लड प्रेशर, मळमळ, उलटी या समस्या होतात. तर काही केसेसमध्ये काही लोकांचा मृत्यूही होतो.