Omicron News: मस्तच! फक्त 'हे' सोपं काम करा; तब्बल २२५ टक्क्यांनी कमी होईल ओमायक्रॉनचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 11:38 AM2021-12-08T11:38:46+5:302021-12-08T11:40:37+5:30
Omicron News: ओमायक्रॉनचा वाढता धोका; देशात आतापर्यंत २३ रुग्णांची नोंद
न्यूयॉर्क: कोरोनाच्या संकटातून जग बाहेर पडेल असं वाटत असताना नव्या व्हेरिएंटनं जगाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटनं ४० हून अधिक देशांमध्ये शिरकाव केला आहे. गेल्या गुरुवारी (२ डिसेंबर) देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. सध्याच्या घडीला देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. यातील सर्वाधिक १० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
ओमायक्रॉनचा धोका टाळायचा असल्यास नेमकी काय काळजी घ्यायची असा प्रश्न लोकांना पडला आहे. कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यात फिजिकल डिस्टन्सिंगपेक्षा महत्त्वाची भूमिका मास्क बजावतो. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. तीन मीटर अंतराच्या तुलनेत तोंडावर मास्क लावल्यास विषाणूची लागण होण्याचा धोका २२५ पटीनं कमी होऊ शकतो. कोरोना संकट आल्यापासूनच महामारी तज्ज्ञ मास्कचं महत्त्व सांगत आहेत.
जर्मनी आणि अमेरिकेमधील तज्ज्ञांनी केलेल्या एका संशोधनातून मास्कचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. जर तुम्ही एका बाधित व्यक्तीपासून ३ मीटर अंतरावर ५ मिनिटं उभे आहात आणि दोघांनीही मास्क घातला नसेल, तर तुम्हाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता ९० टक्के इतकी असेल. जर एखाद्या व्यक्तीनं सर्जिकल मास्क घातला असेल, तर हीच वेळ ९० मिनिटांपर्यंत जाते. जर दोघांनी मेडिकल ग्रेड FFFP मास्क घातला असेल आणि ते एकमेकांपासून ३ मीटरवर उभे असतील, तर एक तासानंतरही कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका ०.४ टक्के इतकाच असतो.
गोटिंगेन आणि कॉर्नेल विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात फिजिकल डिस्टन्सिंगची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र मास्कची भूमिका त्याहून अधिक महत्त्वाची आहे. मास्कचा वापर केल्यास प्रादुर्भावाचा दर ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. मास्कमुळे मिळणारी सुरक्षा फिजिकल डिस्टन्सिंगच्या तुलनेत दुप्पट आहे. यामधून मास्कच्या वापराचं महत्त्व अधोरेखित झालं आहे.