Omicron News: ओमायक्रॉन संकटात मोठा दिलासा! 'त्या' व्यक्तींच्या शरीरात तयार होतेय सुपर इम्युनिटी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:23 AM2021-12-20T11:23:24+5:302021-12-20T11:24:17+5:30
Omicron News: जगभरात ओमायक्रॉन धुमाकूळ घालत असताना दिलासादायक बातमी
मुंबई: देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ओमायक्रॉन बाधितांचा आकडा १५० च्या पुढे गेला आहेत. यातील ५४ रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे काळजी वाढली असताना दुसरीकडे एक दिलासादायक बाब समोर आली आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असलेल्यांच्या शरीरात सुपर इम्युनिटी तयार होत आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर कोरोनाची बाधा होणाऱ्यांमध्ये अँटीबॉडीचं प्रमाण १ हजार ते २ हजार टक्क्यांनी वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या ओरेगाव हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये २६ लोकांच्या अँटिबॉडीजचा अभ्यास करण्यात आला.
लसीकरणानंतर कोरोनाची लागण झालेल्यांच्या शरीरातील अँटिबॉडीजचं प्रमाण १ हजार पटीनं वाढल्याचं अभ्यासातून समोर आलं. काही वेळा तो २ हजार पटीनं वाढला आहे. वैद्यकीय भाषेत सांगायचं झाल्यास ही जवळपास सुपर इम्युनिटी आहे, अशी माहिती संशोधनकर्ते फिकादू यांनी दिली. भारत, अमेरिकेसह संपूर्ण जगात ओमायक्रॉनची दहशत पाहायला मिळत असताना ही माहिती पुढे आली आहे.
अमेरिकेत शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दुप्पट झाली. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येनं विक्रम मोडीत काढले आहेत. ब्रिटनमध्य दररोज ८० हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या आकडेवारीमुळे जगाची चिंता वाढली आहे. भारतात २ डिसेंबरला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर पुढील १७ दिवसांत हा आकडा १५० च्या पुढे गेला आहे.