ओमायक्रॉनची 'ही' नवीन लक्षणं सामान्य समजून दुर्लक्ष कराल तर भविष्यात महागात पडतील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 03:30 PM2021-12-20T15:30:44+5:302021-12-20T15:35:02+5:30
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ओमिक्रॉनची काही नवीन लक्षणं समोर आली आहेत. ही लक्षणं तुम्हा-आम्हाला एरवी बळावणाऱ्या सामान्य समस्येसारखीच आहेत. त्यामुळे सामान्य समजून या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडेल.
भारतासह संपूर्ण जग आता कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटच्या दहशतीत आहे. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत याची लक्षणं सौम्य आहेत किंवा लक्षणं दिसतच नाही आहेत. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे कारण यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ओमिक्रॉनची काही नवीन लक्षणं समोर आली आहेत. ही लक्षणं तुम्हा-आम्हाला एरवी बळावणाऱ्या सामान्य समस्येसारखीच आहेत. त्यामुळे सामान्य समजून या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडेल.
ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत ब्रिटनमध्ये संशोधन झालं. 3 ते 10 डिसेंबरदरम्यान ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. जोई कोविड स्टडी (ZOE COVID Study) या संस्थेमार्फत हा अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यासानुसार नव्या व्हेरिएंटमध्ये सतत सर्दी, तीव्र ताप, चव न लागणं, वास न येणं अशी लक्षणं आता बिलकुल दिसत नाहीत. (Omicron new symptoms)
तर आता नाकातून पाणी येणं (runny nose), डोकेदुखी (Headache), थकवा (fatigue) आणि घसा सुकणं (Dry throat), थकवा, शिंक या लक्षणांचा समावेश आहे. ही सर्व लक्षण सामान्य सर्दीमध्येही असतात. याचा अर्थ ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य सर्दीसारखीच आहेत. हजारो लोकांच्या डेटाचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष समोर आला आहे.
जोई कोविड स्टडीचे प्रमुख शास्त्रज्ञ टिम स्पेक्टर (Tim Spector) यांनी सांगितलं, ओमिक्रॉनची लक्षणं सामान्यपणे सर्दीच्या लक्षणांसारखीच दिसत आहेत. महासाथीचे तज्ज्ञ या लक्षणांबाबत अलर्ट आहेत. कारण ख्रिसमसमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वाढण्याची शक्यता आहे. या लक्षणंना सामान्य सर्दी समजून दुर्लक्ष करू नका. या लक्षणांना ओमिक्रॉनची सुरुवातीचे संकेत म्हणून पाहायला हवं. रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, ओमिक्रॉन आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत कमी खतरनाक आहे. पण तरी शास्त्रज्ञ या नव्या व्हेरिएंटला अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.