Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, पोटासंबंधी 'ही' समस्या दिसेल तर वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 11:56 AM2022-01-13T11:56:18+5:302022-01-13T11:57:02+5:30
Omicron Symptoms : ओमायक्रॉनची काही लक्षणं डेल्टापेक्षा जरा वेगळी आहेत. काही लोकांना सर्दी-खोकला, घशात खवखवसारखी लक्षणं दिसत आहेत.
देशभरात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन(Omicron) आता वेगाने पसरत आहे. हेल्थ एक्सपर्ट लोकांना ओमायक्रॉनच्या लक्षणांबाबत सांगत आहे. जेणेकरून वेळीच काळजी घेता येईल. ओमायक्रॉनची काही लक्षणं डेल्टापेक्षा जरा वेगळी आहेत. काही लोकांना सर्दी-खोकला, घशात खवखवसारखी लक्षणं दिसत आहेत. पण ओमायक्रॉनची लक्षणं (Omicron Symptoms) इतकीच नाहीत. एक्सपर्ट सांगतात की, ओमायक्रॉन श्वसन संक्रमणासोबतच पोटालाही प्रभावित करू शकतो. ओमायक्रॉनची लक्षणं पोटासंबंधीही आहेत.
काय आहेत लक्षणं?
जर तुम्हाला ताप न येताही उलटी, मळमळ होणे आणि पोटदुखी होत असेल तर एक्सपर्टनुसार, हे ओमायक्रॉनचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला श्वसनासंबंधी लक्षण किंवा ताप न येताही पोटाची समस्या होत असेल तर वेळ न घालवता कोविडची टेस्ट करून घ्यावी. नव्या स्ट्रेनमध्ये जास्तीत जास्त लोकांना पोटाची समस्या आढळून आली आहे. वॅक्सीनेटेड लोकांमध्येही ही लक्षणं आढळून येत आहेत. कोविडच्या काही नव्या लक्षणांमध्ये मळमळ होणे, पोट दुखणे, उलटी, भूक न लागणे आणि जुलाब लागणे यांचाही समावेश आहे.
काय म्हणाले एक्सपर्ट?
गुडगांवच्या फोर्टिस मेमोरिअल रिसर्च इन्स्टिट्यूटचे डॉक्टर मनोज गोयल यांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितलं की, 'काही लोकांना सुरूवातीला सर्दी-पळसा न होता केवळ पोटाची समस्या होऊ शकते. यात पाठदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, भूक न लागणे आणि जुलाब यांचाही समावेश आहे. ओमायक्रॉनमुळे पोटातील वरचा थर म्यूकोसा संक्रमित होतो. यामुळे सूजही येते'. एक्सपर्ट सांगतात की, वॅक्सीनचे दोन डोज घेतलेल्या लोकांनाही पोटासंबंधी ही समस्या होत आहे. ही लक्षणं गंभीर नाहीत आणि चिंतेचीही बाब नाही.
करू नका दुर्लक्ष
एक्सपर्ट सांगतात की, पोटदुखी, मळमळ आणि भूक न लागणे याकडे सामान्य फ्लू सारखं बघू नका. जर तुमच्यात ही लक्षणं असतील तर स्वत:ला लगेच आयसोलेट करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत: कोणतीही औषधं घेऊ नका. स्वत:ला हायड्रेट ठेवा, हलका आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. मसालेदार पदार्थ आणि मद्यसेवन टाळा.