CoronaVirus News: 'या' चुकांमुळे वाढतोय ओमायक्रॉनचा धोका; संसर्ग टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 04:10 PM2022-01-14T16:10:13+5:302022-01-14T16:11:19+5:30
CoronaVirus News: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा पाच हजारांच्या पुढे; कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ
मुंबई: भारतासह अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटनं थैमान घातलं आहे. ओमायक्रॉन अतिशय वेगानं पसरतो. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनादेखील ओमायक्रॉनची लागण होत असल्यानं चिंता वाढली आहे. देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ५ हजारांच्या पुढे गेला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वेगानं होत असल्यानं तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे.
ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. मात्र सर्वसामान्यांकडून होणाऱ्या काही चुकांमुळे आणि गैरसमजांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. अनेकांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
आधी लागण झालीय, मग पुन्हा होणार नाही- एकदा कोरोना होऊन गेलाय, मग पुन्हा लागण होणार नाही, असा अनेकांचा समज आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात, ही बाब खरी आहे. मात्र यामुळे कोरोनाची लागण पुन्हा होणारच नाही असं नाही.
ओमायक्रॉनची लक्षणं सौम्य असल्यानं घाबरण्याची गरज नाही- ओमायक्रॉनच्या बहुतांश प्रकरणांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणं दिसून येत आहेत. त्यामुळे यापासून बचाव करण्याची फारशी गरज नाही, असा काहींचा समज आहे. त्यामुळे सतर्क राहायला हवं.
लसीचे दोन्ही डोस घेतलेत- ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे. मात्र दोन डोस घेतल्यानंतर ओमायक्रॉनची लागण होणारच नाही असं नाही. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काळजी घेणं आवश्यक आहे.