Omicron Variant : कोरोनाची लागण झालेल्या लोकांना ओमायक्रॉनपासून किती धोका? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 08:47 PM2021-12-04T20:47:18+5:302021-12-04T20:48:14+5:30
Omicron Variant : संशोधनात याबाबतचे पुरावे मिळाले आहेत आणि असे आढळले आहे की, ओमायक्रॉन हे बीटा किंवा डेल्टा प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.
केप टाऊन : एकदा कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या लोकांना पुन्हा ओमिक्रॉन (Omicron)व्हेरिएंटचा संसर्ग होऊ शकतो का? याबाबतचा नवीन खुलासा एका स्टडीतून समोर आला आहे सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांना याआधी कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे, असे दक्षिण आफ्रिकेतील संशोधकाने सांगितले. तसेच, त्यांना संशोधनात याबाबतचे पुरावे मिळाले आहेत आणि असे आढळले आहे की, ओमायक्रॉन हे बीटा किंवा डेल्टा प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.
कोविड प्रोटोकॉलचे पालन करा
रिपोर्टनुसार, ओमायक्रॉनच्या संसर्गावर फायनल स्टडी अद्याप झालेली नाही. मात्र, प्राथमिक परिणामांवरून असे दिसून येते की, ज्यांना आधीच कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, अशा लोकांवर याचा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना यापूर्वी कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच, त्यांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास कोणतीही टाळाटाळ करू नये.
इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य
या कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरिएंटच्या यादीत समावेश केला आहे. तसेच, हा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, असेही जागतिक आरोग्य संघटने म्हटले आहे. याशिवाय, सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या डोसचाही ओमायक्रॉन व्हेरिएंटवर काही विशेष परिणाम होणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, अनेक तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, लस कोणत्याही व्हेरिएंटपासून नक्कीच काही प्रमाणात संरक्षण देईल.
आफ्रिकेत ओमायक्रॉनचे 35 हजारांहून अधिक रुग्ण
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटचा रुग्ण सर्वात आधी सापडला होता. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचे 35 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी बरेच लोक असे आहेत, ज्यांना आधीही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेशिवाय जगातील काही देशांमधून ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत 30 हून अधिक देश ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या कचाट्यात आले आहेत. त्यामुळे जगातील अनेक देशांनी आफ्रिकी देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.