सर्दी, डोकेदुखीसारख्या आजारांवर ऑनलाइन सल्ला, 'ई-संजीवनी'च्या माध्यमातून अनेक रुग्णांना लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:46 IST2025-02-04T15:46:37+5:302025-02-04T15:46:53+5:30
ऑनलाइन ओपीडी सेवाही सुरू केली आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्यासह किरकोळ आजारांसाठी रुग्णालयात जाण्याची गरज पडत नाही.

सर्दी, डोकेदुखीसारख्या आजारांवर ऑनलाइन सल्ला, 'ई-संजीवनी'च्या माध्यमातून अनेक रुग्णांना लाभ
केंद्र सरकारने आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नाही, तर ऑनलाइन ओपीडी सेवाही सुरू केली आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्यासह किरकोळ आजारांसाठी रुग्णालयात जाण्याची गरज पडत नाही. गेल्या वर्षभरात सर्दी, डोकेदुखीसारख्या आजारांवर ई-संजीवनी योजनेच्या माध्यमातून अनेक रुग्णांनी ऑनलाइन उपचार करून घेतले आहेत.
वातावरणातील बदलामुळे अनेक दुखणे, साथीचे आजार डोके वर काढतात. त्यामुळे डॉक्टरांकडे औषधोपचारासाठी जावे लागते. डॉक्टरांकडे गेल्यावर लागणारा वेळ पाहता अनेकदा रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. वेळ आणि त्रास वाचावा म्हणून केंद्र सरकारच्या वतीने 'ई-संजीवनी' योजना सुरू केली आहे.
इथे करा नोंदणी...
- ऑनलाइन ओपीडीसाठी https://esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून किंवा ई-संजीवनी अॅप डाउनलोड करून ऑनलाइन उपचारासाठी वेळ घेता येते.
- सकाळी साडेनऊपासून ही ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू होते. याद्वारे जिल्ह्यात अनेक रुग्णांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे.
काय आहे 'ई-संजीवनी'
'ई-संजीवनी' ओपीडी नावाचे अॅप आहे. याद्वारे रुग्णांना घरबसल्या डॉक्टरांकडून सल्ला घेता येतो. सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी १:४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत याद्वारे डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो.
नोंदणी कशी कराल?
ई-संजीवनी ओपीडी अॅप मोबाइलमध्ये घेतल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर संबंधित डॉक्टरांशी नागरिकांना आपल्याला असलेल्या आजाराबाबत चर्चा करून त्याचे आवश्यक ते मार्गदर्शन संबंधितांकडून मिळते. यानंतर ही प्रिस्क्रिप्शन डाउनलोड करून नागरिकांना औषध-गोळ्या घेता येतात.