जागतिक आरोग्य दिनी अवयवदानाचा जागर
By संतोष आंधळे | Published: April 4, 2023 09:16 AM2023-04-04T09:16:56+5:302023-04-04T09:17:22+5:30
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जागतिक आरोग्य दिनानिमित्त वैद्यकीय विश्वात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यानुसार ७ एप्रिल रोजी अवयवदान जनजागृतीचे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत हे अभियान राबविले जाणार आहे. गेल्या काही दिवसांत वैद्यकीय शिक्षण विभागाने विविध व्याधींबाबत जनजागृती सुरू केली आहे.
राज्यात अवयवदान अल्प प्रमाणात होते. राष्ट्रीय अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था देशातील अवयवदानाचे नियमन करण्याचे काम पाहत असते. राज्यातील सर्व अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था त्यांच्या देखरेखीखाली काम करत असतात. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.
अवयवनिहाय राज्यातील रुग्णांची प्रतीक्षा यादी
- मूत्रपिंड - ५,७८४
- यकृत - १,५२८
- हृदय - १४२
- स्वादुपिंड - ५८
- फुफ्फुस -४४
- छोटे आतडे - ११
(जानेवारी २०२३ पर्यंत आकडेवारी)