ऑर्थोपेडिक विकारांवर शस्त्रक्रिया न करता उपचार शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 01:56 AM2019-01-28T01:56:54+5:302019-01-28T01:57:10+5:30
नवीन उपचारपद्धतींमध्ये चुंबकीय अनुनाद (मॅग्नेटिक रेझोनन्स) पद्धती ही एक फिजिओथेरपीशी संबंधित नॉन-इन्व्हेसिव उपचारपद्धती आहे.
- डॉ. प्रदीप महाजन
नवीन उपचारपद्धतींमध्ये चुंबकीय अनुनाद (मॅग्नेटिक रेझोनन्स) पद्धती ही एक फिजिओथेरपीशी संबंधित नॉन-इन्व्हेसिव उपचारपद्धती आहे. हळूहळू फार्माकॉॅलॉजिकल उपचारपद्धतीची जागा घेण्याची क्षमता या उपचारपद्धतीमध्ये आहे. आण्विक चुंबकीय अनुनाद उपचारांचे पेटंट ब्रॅण्ड एमबीएसटीखाली घेण्यात आलेले आहे. ही निदानशास्त्रात वापरली जाणारी सर्वज्ञात पद्धती आहे. अलीकडेच ऑर्थोपेडिक विकारांमध्ये या उपचारपद्धतीच्या उपयुक्तततेची पडताळणी करण्यात आली.
एमबीएसटीचा वापर केला असता कूर्चा (कार्टिलेज) पुन्हा तयार होऊ शकतो व हाडांच्या घडणीला चालना मिळते असे दिसून आले आहे. ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांमध्ये ही उपचारपद्धती वरदानासारखी ठरू शकेल. या विकारात हाडांमधील क्षारांची घनता (बोन मिनरल डेन्सिटी) कमी झाल्यामुळे सतत फ्रॅक्चर होण्याचा मोठा धोका असतो. ड जीवनसत्त्वाची पूरके व व्यायामासोबत हे उपचार घेतले असता, ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांमधील बीएमडीच्या प्रमाणात चांगली सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
डिजनरेटिव्ह, ह्युमॅटिक विकारांमध्येही एमबीएसटीमुळे वेदनांपासून तत्काळ आराम मिळतो. याशिवाय खेळताना झालेल्या दुखापतींनाही (स्पोर्ट्स इंज्युरीज) याचा खूप फायदा होतो. मानवी शरीरातील उतींच्या चयापचयावर विद्युत व चुंबकीय क्षेत्रांचे नियंत्रण असते या तत्त्वावर एमबीएसटी आधारलेली आहे. शरीर निरोगी असते तेव्हा पेशी व उतींच्या पुनर्निर्मितीवर ते स्वत: सूचना देऊन नियंत्रण ठेवते. मात्र, उतींना हानी पोहोचल्यास (कुर्चा किंवा हाडांमध्ये) सूचना देण्याच्या यंत्रणेत हस्तक्षेप सुरू होतो. त्यामुळे दुरुस्ती व पुनर्निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होतात. परिणामी वेदना होतात आणि सांध्यांची हालचाल करण्यात अडचणी येतात. रुग्णाला दैनंदिन कामे करणे कठीण होऊन बसते. एमबीएसटीचे उद्दिष्ट आहे हानी पोहोचलेल्या भागातील सूचनांची दिशा बदलून व्यवस्था पुन्हा सामान्य व निरोगी स्थितीत आणणे. ही उपचारपद्धती शरीरातील पेशींना उत्तेजित करते आणि कूर्चा, अस्थिबंध व अन्य उतींची पुनर्निर्मिती पुन्हा सुरू करते. त्यामुळे वेदना कमी होतात आणि सांध्यांची हालचाल सोपी होते.
एमबीएसटीच्या कृतीची प्रस्तावित यंत्रणा म्हणजे ध्वनीलहरींचा वापर करून हायड्रोजन प्रोटॉन्सना उत्तेजन देणे. त्यामुळे शरीरात उच्च ऊर्जेची स्थिती निर्माण होते. मग ही ऊर्जा एमआरआयमध्ये सोडली जाते त्याच पद्धतीने मुक्त केली आहे आणि आसपासच्या उती ती शोषून घेतात. उतींनी ऊर्जा शोषून घेतली की पेशींच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया पुन्हा सुरू होते. एमबीएसटीमुळे पुढील विकारांपासून आराम मिळतो: ह्युमॅटॉइड संधिवात, ऑस्टिओपोरोसिस, क्रीडांगणावर होणाऱ्या दुखापती, पाठीचा कणा/मणक्यातील डिजनरेटिव्ह विकार आणि असे अनेक.
एमबीएसटीचा प्रमुख फायदा म्हणजे ही उपचारपद्धती पेशींच्या स्तरावर काम करते; म्हणूनच ती विकाराच्या मूळ कारणाचे (पॅथोलॉजी) निराकरण करते आणि शरीरावर प्रभावी, दीर्घकाळ टिकणारे व सकारात्मक परिणाम देते. स्नायूंच्या दुखापतीपूर्वीच्या अवस्थेत घेऊन जाण्यास स्मरणशक्तीला मदत मिळावी यासाठी फिजिओथेरपी सुरू ठेवणे अपरिहार्य आहे.