मुंबईत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव; शहर उपनगरांत बीए.२.७५ व्हेरिएंटचा सर्वाधिक प्रसार
By स्नेहा मोरे | Published: September 15, 2022 09:19 PM2022-09-15T21:19:50+5:302022-09-15T21:20:47+5:30
कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १५ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘कोविड - १९’ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारणाच्या १५ व्या फेरीत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील असणारे सर्व नमुने अर्थात १०० टक्के नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. या फेरीत २८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
यासाठी जुनकीय सूत्र निर्धारण महत्त्वाचे- कोविड विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणुच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते.
८४ रुग्णांनी लसीची एकही मात्रा घेतली नाही- २८८ रुग्णांपैकी १% अर्थात २ रुग्णांनी लसीची केवळ एकाच मात्रा घेतली आहे. तर ७०% अर्थात २०२ रुग्णांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत. तर २९% अर्थात ८४ रुग्णांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही.
'व्हेरिएन्ट' नुसार विश्लेषण- जनुकीय सूत्रांचे निर्धारणात २८८ नमुन्यांपैकी ३७% अर्थात १०६ नमुने हे BA.२.७५ व्हेरिएन्टचे आहेत. तर ३३% अर्थात ९६ नमुने हे BA.२.७५.१ व्हेरिएन्टचे आहेत. २१% म्हणजेच ६० नमुने हे BA.२.७५.२ व्हेरिएन्टचे आहेत. तर २% अर्थात ६ नमुने हे प्रत्येकी BA.५.२ व BJ.१ या दोन व्हेरिएन्टचे आहेत. एकूण ४ नमुने हे BA.२.७६ या व्हेरिएन्टचे आहेत. तर ३ नमुने हे BA.२ या व्हेरिएन्टचे आहेत. तर २ नमुने हे BH.१ या व्हेरिएन्टचे आहेत. तसेच BA.२.१०.४, BA.२.७४, BA.५.१, BE.१ आणि BE.३ या व्हेरिएन्टचे प्रत्येकी १ रुग्ण आहेत.
रुग्णांना गंभीर लक्षणे नाहीत- २८८ रुग्णांपैकी ३२% अर्थात ९१ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. तर ४१ ते ६० या वयोगटात देखील २७% म्हणजेच ७७ एवढे रुग्ण आहेत. २९% म्हणजेच ८४ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. ३% म्हणजेच १० रुग्ण हे '० ते २०' या वयोगटातील; तर ९% म्हणजे २६ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या २८८ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील ७ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ३ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील आहेत, ६ ते १२ वर्षे या वयोगटात एकही नमुना आढळून आला नाही; तर ४ नमुने हे १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणुच्या उप प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. यातील सर्व रुग्ण १२ जून ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील असून सर्व रुग्ण बरे झाले आहेत.