प्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये 'या' आजाराचा वाढतो धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 09:52 AM2018-11-09T09:52:40+5:302018-11-09T09:53:42+5:30
प्रदूषण आणि स्मॉगची समस्या सध्या दिल्ली भारताचच्या काही भागांमध्ये डोकं वर काढत आहे.
प्रदूषण आणि स्मॉगची समस्या सध्या दिल्ली भारताचच्या काही भागांमध्ये डोकं वर काढत आहे. यामुळे अनेकांना केवळ श्वासासंबंधी आणि हृदयासंबंधीच समस्यांचा सामना करावा लागतो असे नाही तर लहान मुलांना ऑटिझमचाही धोका अधिक असतो. याकारणाने नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात इशारा देण्यात आला आहे की, ऑउटडोर प्रदूषण म्हणजेच गाड्यांमधून निघणारा आणि फॅक्टरींमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे लहान मुलांमध्ये ऑटिझमचा धोका ७८ टक्क्यांनी वाढतो. या शोधामध्ये चीनच्या शांघायमध्ये जन्मलेल्या मुलांचा अभ्यास करण्यात आला.
काय आहे ऑटिझम?
ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानसकि क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे व वागणे यात समस्या निर्माण होतात. ही मुले इतर मुलांसारखी दिसत असली, तरी त्यांचे दैनंदिन जीवन इतरांसारखे नसते. ऑटिझमग्रस्त मुलांच्या काही समस्या वेगळ्या असतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
९ वर्ष केलं गेलं परिक्षण
या अभ्यासात १२४ अशा मुलांना सहभागी करुन घेतले होते, जे आधीपासून ऑटिझमने ग्रस्त आहेत. तर १ हजार २४० सामान्य मुलांना सहभागी करुन घेतले होते. ९ वर्ष या मुलांवर अभ्यास करण्यात आला. दरम्यान वायु प्रदूषण आणि ऑटिझम यात काय संबंध आहे याचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास एन्वायर्नमेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. हा असा पहिला अभ्यास आहे ज्यात विकसनशील देशातील मुलांवर वायु प्रदूषणात जास्त वेळ राहणे आणि ऑटिझममध्ये संबंध असल्याचं सांगण्यात आलं आहे.
वातावरणातील इतरही काही गोष्टी कारणीभूत
चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसचे शिलिंग गुओ सांगतात की, 'ऑटिझम का होतो? आणि याचं कारणं शोधणं कठीण काम आहे. हे पूर्णपणे समजून घेता येत नाही. पण आंनुवांशिकता आणि इतर कारणांसोबतच वातावरणाशी संबंधित काही गोष्टींमुळे हा वाढतो. लहान मुलांचा मेंदू विकसीत होत असतो आणि अशावेळी वातावरणातील विषारी कण लहान मुलांच्या इम्यून सिस्टमसोबतच मेंदूच्या कार्यालाही प्रभावित करतात.
प्रदूषणामुळे इतक्यांचा होतो मृत्यू
WHO नुसार, दररोज वाढत्या प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरतो आहे. कारण याने दरवर्षी ४.२ मिनियन म्हणजेच ४२ लाख लोकांचा मृत्यू होतो आहे. वातावरणातील प्रदूषित तत्वांमुळे चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये आजारांसोबतच वेळेआधी मृत्यू होणे अशाही घटना वेगाने वाढत आहेत.