अरे थांबा थांबा, नका खाऊ एवढी फळं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 05:55 PM2017-08-05T17:55:13+5:302017-08-05T17:56:59+5:30

फळांनी वजन कमी नाही, वाढूही शकतं..

overeating fruits cause weight gain | अरे थांबा थांबा, नका खाऊ एवढी फळं..

अरे थांबा थांबा, नका खाऊ एवढी फळं..

Next
ठळक मुद्देफळं जास्त खाल, तर त्यानं कॅलरीज वाढतील.वजन कमी होण्याऐवजी वाढेल.कोणती फळं, कोणत्या प्रमाणात खावीत याकडे लक्ष हवं.जास्त फळं खाल्लीत तर आरोग्याच्याच समस्या निर्माण होतील.

- मयूर पठाडे

फळं आरोग्याला चांगलीच असतात, यात कोणतीच शंका नाही. त्यामुळेच कुठल्याही आजारपणात डॉक्टर सल्ला देतात तो फळं खाण्याचा. तुम्हाला तुमचं वजन वाढू द्यायचं नसेल, ते आटोक्यात ठेवायचं असेल तर फळं खाल्ल्यानं वाढत्या वजनाचा प्रश्न नक्कीच सुटू शकतो. पण..
पण हे झालं अर्धसत्य. फळं आरोग्याला चांगली आहेत म्हणून तुम्ही नुसती फळंच खात बसलात, तर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल फळांमुळे तुमच्या शरीरातील कॅलरीजची संख्या वाढत जाईल आणि त्यामुळे अर्थातच वजनही वाढेल.
म्हणजे ज्या कारणासाठी फलाहार सुरू केला, तोच त्याच्या मुळावर उठला!
योग्य प्रमाणात नियमित फलाहार करायला काहीच हरकत नाही, पण त्यासोबत भाज्या, प्रोटिन्स, आणि होल ग्रेन्स यांचाही आहारात समावेश असायला हवा.
फळांमध्ये तुलनेनं कमी कॅलरीज असतात, हे खरं, पण सर्वच फळांसाठी ते लागू नाही. शिवाय आपण किती फळं खातो त्यावरही त्यातून किती कॅलरीज आपल्या शरीरात जातात ते अवलंबून आहे.
ताज्या फळामध्ये साधारणपणे १५ ते २० कॅलरीज असतात, पण पण तेच मध्यम आकाराचं सफरचंद तुम्ही घेतलं तर त्यात शंभर कॅलरीज असतात. आरोग्यदायी आहाराच्या प्रयत्नात तुम्ही रोज तीन सफरचंदं खाल्लीत तर तीनशे कॅलरीज झालेत की!
ड्रायफ्रुट्समध्ये तर आणखीच जास्त कॅलरीज असतात.
आपल्या शरीर आणि मनाचं योग्य संतुलन राखण्यासाठी रोज आपण फळं खाणं गरजेचंच आहे, त्यातून निश्चितच अपेक्षित परिणामही दिसून येईल, पण त्याचा अतिरेक झाला, तर आरोग्याच्याच समस्या निर्माण होतील.

कोणत्या फळांनी वजन वाढेल?
केळी, द्राक्षे, खजूर, ड्रायफ्रूटस, पेरू, आंबा, चिकू यासारखी फळं जास्त खाल्ली तर शरीरातील कॅलरीज वाढू शकतात.

वजन आटोक्यात ठेवण्यासाठी काय खावं?
फळांच्या सोबत भाज्याही रोजच्या आहारात असल्या पाहिजेत. पालक, भोपळा, मुळा, काकडी, मशरूम्स.. यासारखा आहारही आपल्या भोजनात नियमित हवा.

Web Title: overeating fruits cause weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.