पॅनकेक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 09:33 AM2018-04-24T09:33:12+5:302018-04-24T09:33:12+5:30

धिरड्यांना नाक मुरडणारे पॅनकेक मात्र आवडीनं खातात. करून पाहा..

Pancake | पॅनकेक

पॅनकेक

googlenewsNext

- शुभा प्रभू-साटम

पॅनकेक म्हणजे फिरंगी धिरडी. धिरडी म्हटलं की नाक मुरडलं जातं; पण नाव बदललं की मुलंच काय पण मोठेही चवीनं खातात. परदेशात जे पॅनकेक केले जातात त्यामध्ये मैदा, अंडं आणि साखर असते. म्हणजे त्यांची पारंपरिक कृती तशीच आहे. या पॅनकेकवर मग मेपल सिरप, वेगवेगळी फळं, जॅम असं घालून खाल्लं जातं. अमेरिकेत पॅनकेक हे अगदी घरगुती खाणं समजतात. आपल्याकडे कसे आईच्या हातची पुरणपोळी किंवा मोदक आवडीनं खातात तसंच थोडेफार इकडे पॅनकेकच्या बाबतीत होतं. यात वापरलं जाणारं साहित्य तसं पौष्टिक नसतं. त्यामुळेच आपण आपले अस्सल देशी पौष्टिक घटक वापरून पॅनकेक करू शकतो.
या पॅनकेकसाठीचं बेसिक साहित्य म्हणजे कणीक, गुळाची पावडर/काकवी हवं तर पिठीसाखर घ्या. या एवढ्या साहित्यातून चवीचे आणि पौष्टिक पॅनकेक करता येतात.

कणकेचे पॅनकेक
साहित्य : एक वाटी कणीक, गुळाची पूड/काकवी किंवा साखर (पिठीसाखर अधिक चांगली), आवडीप्रमाणे गोड ताक/पाणी (ताक घेतलं तर चव छान येते), मऊ होण्यासाठी चिमूटभर बेकिंग सोडा, पॅनकेक सजवायला स्ट्रॉबेरी/आंबा/सफरचंद काहीही फोडी करून, मेपल सिरप किंवा मध.
कृती : पिठात गूळ/साखर/काकवी घालून (गूळ असेल तर तो नीट विरघळेपर्यंत) एकत्र करा नाहीतर ओतताना त्रास होईल. आता यात ताक घालून बेकिंग पावडर घालून छान सरसरीत करून घ्या. पाचेक मिनिटं मिश्रण तसंच ठेवून द्या. जास्त वेळ ठेवलं तर चांगलं.
नॉनस्टिक तव्यावर बटर घालून ते गरम झालं की छोटी छोटी धिरडी काढा. पॅनकेक करताना गॅस मंद हवा. दोन्ही बाजूनं पॅनकेक तपकिरी होईतो शेकून घ्या. वरून मग जे हवं ते टॉपिंग्स घालायचे आणि मध किंवा मेपल सिरप ओतून ते खायचे.
हे पॅनकेक अशा पद्धतीनं केले तर छान मऊ होतात. कणीक असल्यानं ते पौष्टिक होतात. सध्या आंबा उपलब्ध असल्यानं आंब्याचा रस जर यावर घातला तर पॅनकेक अफलातून लागतात. मग या पॅनकेकसोबत इतर कशाचीच गरज नाही. हाताशी जरा वेळ असला तर आणखी एक सजावट करू शकता. जी फळं घरात आहेत ती बारीक कापून किंचित वाफवून घ्यावीत. ती मऊ झाली की त्यात घरात असलेला जॅम घालून गार करावीत. मस्त तुकतुकीत दिसतात. याचं टॉपिंग पॅनकेकवर करा, अगदी हॉटेलातल्यासारखी दिसतात. अशा टॉपिंगना फ्रूट प्रिसर्व म्हणतात, पौष्टिक आणि स्टायलिश असा सोपा नाश्ता. एकदा करून पाहा, सारखा करावासा आणि खावासा वाटेल!

(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणाऱ्या लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत. shubhaprabhusatam@gmail.com)
 

Web Title: Pancake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.