'या' प्रोटीनमुळे डायबिटीसचा धोका कित्येक पटीने वाढतो, वेळीच व्हा सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:58 PM2022-02-02T15:58:14+5:302022-02-02T16:33:35+5:30

भारतीयांच्या शरीरात असलेलं एक प्रोटिन मधुमेह वाढण्यामागे कारणीभूत असल्याचं एका संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे. आयआयटी मद्रास (IIT-M Research on Diabetes) मधील एका आंतरराष्ट्रीय संशोधन टीमनं हे संशोधन केलं आहे.

Pancreastatin is dangerous for diabetes it may increase says research | 'या' प्रोटीनमुळे डायबिटीसचा धोका कित्येक पटीने वाढतो, वेळीच व्हा सावधान!

'या' प्रोटीनमुळे डायबिटीसचा धोका कित्येक पटीने वाढतो, वेळीच व्हा सावधान!

Next

सध्याच्या धकाधकीच्या काळात ताणतणाव जास्त आहे. जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे मधुमेह अर्थात डायबेटिसचा (Causes of Diabetes) धोका वाढला आहे. जगभरात तर हे प्रमाण वाढतंच आहे पण भारतीयांमध्ये तर हे प्रमाण अधिकच वाढतंय. भारतीयांच्या शरीरात असलेलं एक प्रोटिन मधुमेह वाढण्यामागे कारणीभूत असल्याचं एका संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे. आयआयटी मद्रास (IIT-M Research on Diabetes) मधील एका आंतरराष्ट्रीय संशोधन टीमनं हे संशोधन केलं आहे.

या प्रोटिनमुळे मधुमेहाबरोबरच हार्ट ॲटॅक, हायपरटेन्शनचाही धोका वाढल्याचं या संशोधनात म्हटलं आहे. IIT-M मधील भूपत अँड ज्योती मेहता स्कूल ऑफ बिझनेसच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रा. नितीश आर. महापात्रा यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं. एकूण १५ टक्के भारतीय आणि अन्य दक्षिण आशियाई लोकसंख्येमध्ये हा घटक (म्हणजेच प्रोटिन) आढळला आहे. या लोकांना अन्य लोकांच्या तुलनेत हायपरटेन्शन, टाईप-2 चा मधुमेह, हृदय आणि रक्तवाहिन्यांचा (coronary artery disease) आजार होण्याचा धोका १.५ टक्के अधिक असल्याचं या अभ्यासातून पुढे आलं आहे. डेक्कन हेराल्डनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

माणसासह सस्तन प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या Chromogranin A (CHGA) या प्रथिनाचा Pancreastatin हा एक छोटा घटक आहे. इन्सुलिन स्रवण्याबाबत हे महत्त्वाची भूमिका बजावतं. रक्तातील ग्लुकोज/ग्लुकागॉन आणि sulphonylurea सारख्या औषधांना प्रतिसाद म्हणून हे इन्शुलिनच्या स्रावाला प्रतिबंध करते, असं IIT-M नं म्हटलं आहे.

'हे कॉम्बिनेशन शरीरात असलेल्या भारतीय आणि दक्षिण आशियाई लोकांना चयापचयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते,' असंही या अभ्यासात म्हटलं आहे. अमेरिकन डायबेटिस असोसिशएशनच्या (American Diabetes Association) ‘डायबेटिस’ या मुखपत्रात या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. भारतातील काही जणांवर (n-400) या अनुवंशिक घटकाचा हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम या टीमने आधी अभ्यासला होता. या घटकाचा उच्च प्लाझ्मा ग्लुकोज पातळीशी संबंध असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

या संशोधनाचा निदान आणि वैयक्तिक औषधोपचारांवर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल. अनुवंशिक आजारांचं निदान लवकर होण्यासाठी या अभ्यासातील निष्कर्षांचा उपयोग होईल. विशेषत: टाईप-2 चा डायबेटिस लवकर ओळखून त्यावर उपचार करणं शक्य होईल असं ते म्हणाले. 'विशेषत: ज्यांच्या कुटुंबांमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित तसंच पचनक्रियेशी संबधित आजार आहेत, त्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी, आजारावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी या अभ्यासाचा नक्कीच जास्त उपयोग होईल,' असं प्राध्यापकांचं म्हणणं आहे.

'आम्ही आमच्या संशोधनाची व्याप्ती वाढवली होती. (n-4300) यामध्ये दक्षिण आणि उत्तर भारतातील व्यक्तींचाही समावेश होता. यामध्ये तांत्रिक आधारासाठी प्रयोग आणि कॉम्प्युटिंग मॉडेलिंग सिस्टिम अशा दोन्ही पद्धती आमच्या टीमने वापरल्या,' असंही या अभ्यासाच्या लेखकांनी म्हटलं आहे. एकूणच वैद्यकीय क्षेत्रात हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यास मानला जात आहे. आता याचे निष्कर्ष प्रत्यक्ष जीवनात कसे उपयोगी पडू शकतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल.

Web Title: Pancreastatin is dangerous for diabetes it may increase says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.