मार्ग सुदृढ मनाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 11:49 AM2018-10-04T11:49:09+5:302018-10-04T11:50:23+5:30
स्वतःच्या बुद्धीची आणि भावनेची कुवत समजून कार्य करताना समाधानी राहून येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यास समर्थ म्हणजे मानसिक स्वास्थ्य.
- डॉ. चेतन लोखंडे/ डॉ. अदिती आचार्य-लोखंडे
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, तसंच सामाजिक दृष्टीनं व्यवस्थित आणि रोगमुक्त असणे. आज आपण समाजामध्ये शारीरिक आरोग्याबद्दल जनजागृती झालेली पाहतोय. परंतु मानसिक आरोग्याबाबत अजूनही उदासीनता दिसते. स्वतःच्या बुद्धीची आणि भावनेची कुवत समजून कार्य करताना समाधानी राहून येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यास समर्थ म्हणजे मानसिक स्वास्थ्य. परंतु आजही आपल्याकडे मानसिक आरोग्याबाबत बोलणं म्हणजे एक प्रकारचा सामाजिक कलंक मानला जातो. एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास असेल तर ते त्याची वाच्यता करत नाहीत. कारण त्याला भीती असते की, लोक काय विचार करतील? अशी माणसे त्याचा त्रास सहन करतात आणि आनंदी जीवनाला मुकतात.
आपण आता 21व्या शतकात आहोत. 2020 साली भारताची लोकसंख्या 130 कोटींच्या पुढे असणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशाची सर्वांत मोठी शक्ती आहे ती म्हणजे मानवी शक्ती. या मानवी शक्तीचे शिक्षणाच्या आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विकासाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु ITच्या भाषेत म्हणायचं झालं तर माणसाचं शरीर हे जर त्याचं हार्डवेअर असेल तर त्याचं मन हे सॉफ्टवेअर आहे आणि बदलत्या काळात हे सॉफ्टवेअर अपडेट ठेवणं महत्त्वाचे आहे. अन्यथा सिस्टम हँग होऊ शकते. आजच्या बदलत्या काळात सभोवताली माहितीचा पूर आलेला आपल्याला दिसतो. स्पर्धात्मक आयुष्य, बदलेली जीवनशैली, नाते संबंधांतील दुरावा, चंगळवादाची संस्कृती, डिजिटल आव्हाने यामुळे लोकांची उडालेली तारांबळ आपण पाहतोच आहोत.
याचं उदाहरण द्यायचे झाले तर, माझ्या क्लिनिकमध्ये आलेला 19 वर्षीय मधू परीक्षेत एका विषयात नापास झाल्यानं आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. 35 वर्षीय मनोज कामाच्या आणि आयुष्याच्या स्पर्धेत मागे पडल्यानं उदासीनतेच्या खोल दरीत गेलेला दिसतो.
45 वर्षीय नीलमताई 20 वर्षांच्या आपल्या सांसारिक आयुष्यानंतर त्यांना नातेसंबंधांमध्ये दुरावा जाणवतो आणि संसारात ओलावा नसल्याचे जाणवून त्यांचे मन दुःखी होते. औद्योगिक क्रांतीनंतर माणसासमोरील आव्हाने बदलली आहेत. आता समस्या या मुख्यत्वे मनोसामाजिक (मानसिक आणि सामाजिक) आहेत. आपल्या विचारपद्धतीचा प्रभाव हा आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो. सदोष विचार पद्धती मानसिक समस्यांना निमंत्रणच असते. आपण जर शांत बसून आपल्या विचार पद्धतींचे विवेचन केले तर आपल्या लक्षात येईल की आपले विचार किती पूर्वग्रहदूषित असतात. सतत दुसऱ्याला जबाबदार धरणे किंवा दोष देणं, याकडे आपला कल असतो. या विचारांतून विविध भावना जन्मतात, त्यावर आपलं वर्तन ठरतं. त्यांचं नकळतपणे सवयींमध्ये कधी रूपांतर होतं हेसुद्धा आपल्या लक्षात येत नाही.
म्हणूनच आनंदी आयुष्य जगण्यासाठी निरोगी आणि मनाचं स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचे आहे. येणाऱ्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, मन म्हणजे काय?, ते कसं काम करतं?, मनाच्या सवयी कशा तयार होतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग.