अजब! दुसरा पळणार, तुम्हाला एनर्जी मिळणार; शास्त्रज्ञांनी एक नवा शोध लावला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 08:09 AM2022-01-03T08:09:39+5:302022-01-03T08:09:53+5:30
तंत्रज्ञान अतिशय वेगाने पुढे जाते आहे आणि त्याचा योग्यप्रकारे उपयोग करून घेतला तर अनेकांना जीवदान आणि पुनर्जीवन मिळू शकते यात संशय नाही.शास्त्रज्ञांनी असाच एक नवा शोध लावला आहे आणि त्यामुळे सारेच अचंबित झाले आहेत.
जगभरात असे लाखो लोक आहेत, त्यापैकी कोणाला हृदय हवे आहे, कोणाला किडनी हवी आहे, कोणाला रक्त हवे आहे, काेणाला यकृत हवे आहे... तंत्रज्ञान अतिशय वेगाने पुढे जाते आहे आणि त्याचा योग्यप्रकारे उपयोग करून घेतला तर अनेकांना जीवदान आणि पुनर्जीवन मिळू शकते यात संशय नाही.
शास्त्रज्ञांनी असाच एक नवा शोध लावला आहे आणि त्यामुळे सारेच अचंबित झाले आहेत. एखाद्या ॲथलिटच्या शरिरातील रक्तातील प्रोटिन्स वेगळे काढून त्याचा इतर रोग्यांसाठी उपयोग करणे शक्य आहे का? त्यांंच्या मेंदूची क्षमता, स्मरणशक्ती वाढवता येणे शक्य आहे का?
- तर शक्य आहे. अल्झायमर्ससारखे आजारही त्यामुळे बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकतात, असाही संशोधकांचा निष्कर्ष आहे. यासंदर्भात ‘नेचर’ या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये एक शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला आहे. शास्त्रज्ञांनी या अभ्यासासाठी एक प्रयोग केला. एक्सरसाईज व्हीलवर शेकडो मैल पळालेल्या ‘ॲथलिट’ उंदरांच्या रक्तातील प्रोटीन काढून ते निष्क्रीय उंदरांमध्ये प्रत्यार्पित करण्यात आलं आणि संशोधकांना एकदम आश्चर्यकारक असा अनुभव आला. जे उंदीर अतिशय निष्क्रीय होते, ज्यांना काही करता येत नव्हते, असे उंदीरही त्यामुळे अतिशय क्रीयाशील, सक्रिय झाले. त्यांच्या मेंदूत सकारात्मक बदल दिसून आला. निष्क्रीय उंदरांमधील मेंदूचे अनेक विकारही यामुळे दुरुस्त करता येऊ शकतात, हेही संशोधकांच्या लक्षात आले.
मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या न्यूरॉलॉजी विभागाचे प्रोफेसर रुडॉल्फ तांझी यांच्या मते, या संदर्भात यापूर्वीही अनेक संशोधने झाली आहेत. साऱ्याच संशोधनांनी प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. व्यायामामुळे मेंदूला प्रोटीनचा पुरवठा चांगल्या प्रमाणात होतो आणि त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगलं राहते, हे जवळपास सर्वच संशोधनांनी सिद्ध केले आहे. स्वत: रुडॉल्फ तांझी यांनी या संदर्भात २०१८मध्ये उंदरांवर संशोधन केले होते आणि व्यायाम व मेंदू यांचा जवळचा संबंध असल्याचं पुन्हा एकदा सप्रमाण सिद्ध झाले होते. पण दुसऱ्याने केलेल्या व्यायामाचा तिसऱ्यालाच फायदा होऊ शकतो, हे मात्र संशोधकांनी पहिल्यांदाच शोधून काढले आहे.
वरिष्ठ संशोधक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंग या संस्थेचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. माधव थांबेसेट्टी यांचे म्हणणे आहे, एकाच्या रक्तातील घटक दुसऱ्याच्या रक्तात, शरिरात प्रत्यार्पित करणे आणि त्यामुळे तुमच्या स्मरणशक्तीत वाढ होणे ही यातली सर्वात महत्त्वाची घटना आहे. याबाबत रटगर्स युनिव्हर्सिटीचे न्यूरॉलॉजिस्ट प्रो. मार्क ग्लुक यांनी मात्र उंदरांवर हा प्रयोग यशस्वी झाला म्हणजे तो माणसांवरही होईल, अशा अतिरेकी विश्वासात राहू नये, त्यासाठी आणखी अनेक तपासण्या कराव्या लागतील, असा सावधगिरीचा इशारा दिला आहे.
स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना अभ्यासात असे आढळून आले की, यकृत आणि हृदयाच्या स्नायूंच्या पेशींमध्ये तयार होणारे क्लस्टरिन प्रोटीन जळजळ होण्याच्या परिणामांविरुद्ध कार्य करते. अमेरिकेमध्येही २० प्रौढ माजी सैनिकांवर एक प्रयोग केला गेला.
या सर्व सैनिकांमध्ये विस्मरण, अल्झायमर होऊ शकण्याची चिन्हे होती. सहा महिने त्यांना विशिष्ट कालावधीसाठी सलगपणे व्यायाम करायला लावल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हा आढळून आले की, त्यांच्यात क्लस्टरिन प्रोटीनची वाढ झालेली आहे. त्यामुळे भविष्यात विस्मरण होण्याचा त्यांचा धोका बऱ्याच अंशांनी कमी झाला. या प्रयोगाच्या अभ्यासक डॉ. केसी फेअरचाईल्ड यांना आढळून आलं की, या सर्व माजी सैनिकांना या प्रयोगाचा फारच फायदा झाला. अनेक व्यक्ती तर अशा असतात, ज्यांना काही कारणांमुळे हालचाल करणे खूप जिकरीचे जाते किंवा त्यांना व्यायाम करणे शक्य होत नाही, त्यांना क्लस्टरिन प्रोटीन वाढविण्याच्या प्रयोगाचा फायदा होऊ शकतो. अनेकजण त्यामुळे सामान्य जीवन जगू शकतात.
‘ॲथलिट’ उंदरांमुळे एका नव्या संशोधनाला चालना मिळाली आहे आणि त्यामुळे जगभरातील अनेकांना त्याचा लाभ मिळेल, असा संशोधकांना विश्वास आहे. ‘ॲथलिट’ उंदरांवर अजूनही प्रयोग सुरू आहेत आणि त्यातून आणखी आश्चर्यकारक वैद्यकीय प्रगती पाहायला मिळेल, असे संशोधकांचे भाकीत आहे.
‘ॲथलिट प्रोटीन’चे औषध!
संशोधक डॉ. रुडॉल्फ तांझी यांचे यासंदर्भात म्हणणे आहे, प्रोटीन हे अनेक दृष्टींनी महत्त्वाचे असले, तरी रक्तातून ते दिले जाण्यापेक्षा ‘ॲथलिट प्रोटीन’चे औषध तयार करणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर आहे. कारण त्यात इतरही अत्यावश्यक घटक समाविष्ट करता येतील. कोणते प्रोटीन अधिक प्रभावी आहे आणि नव्या उपचारात त्याचा कसा लाभ करुन घेतला जाईल, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, व्यायामामुळे तयार झालेल्या प्रोटीनचा उपचारात लवकरात लवकर समावेश करणे ही या अभ्यासाची यशस्विता ठरेल.