कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा अँटीबॉडी कॉकटेलने उपचार, WHO ने केली शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:45 PM2021-09-24T19:45:11+5:302021-09-24T19:45:40+5:30
WHO च्या गाइडलाइन डेव्हलपमेंट ग्रुप पॅनलने कोरोना रुग्णांच्या दोन ग्रुपला ‘कासिरिवीमाब’ आणि ‘इमदेविमाब’ च्या कॉकटेलने उपचार करण्याची शिफारस केली आहे.
जागतिक आरोग्य संघटने(WHO)नं रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णांना दोन अँटीबॉडी कॉम्बिनेशन देण्याची शिफारस केली आहे. WHO च्या गाइडलाईन डेव्हलपमेंट ग्रुप पॅनेलने कोविड-19 रुग्णांच्या दोन वेगवेगळ्या गटांना 'कासिरिवीमाब' आणि 'एमदविमाब'च्या एकत्रित उपचारांची शिफारस केली आहे.
पहिल्या गटात अशा रुग्णांचा समावेश होता, ज्यांना गंभीर संसर्ग नाही परंतु, त्यांना हॉस्पिटलायझेशनचा धोका आहे. दुसऱ्या गटात, अशा लोकांना समाविष्ट करण्यात आले, जे गंभीर आजारी आहेत परंतु ते सीरोनेगेटिव्ह आहेत. म्हणजेच ज्यांचे शरीर संसर्गाविरूद्ध अँटीबॉडी तयार करू शकत नाहीत.
अभ्यास दोन शिफारसींवर आधारित आहे
पहिली शिफारस तीन चाचण्यांमधील नवीन पुराव्यांवर आधारित आहे, परंतु अद्याप अभ्यासकांकडून याचा आढावा घेण्यात आलेला नाही. चाचणीमध्ये असे आढळून आले की ही दोन औषधे हॉस्पिटलायझेशनचा धोका आणि गंभीर संसर्गाच्या जोखीम गटात येणाऱ्या लोकांमध्ये लक्षणांचा कालावधी कमी करतात.
दुसरी शिफारस दुसऱ्या चाचणीच्या डेटावर आधारित आहे. यात असे दिसून आले की, दोन अँटीबॉडी वापरामुळे मृत्यूचा धोका आणि सीरोनेगेटिव्ह रुग्णांमध्ये कृत्रिम श्वासोच्छवासाची आवश्यकता कमी होते. अभ्यासात असे आढळून आले की 'कॅसिरिविमाब' आणि 'इमडेविमाब' उपचारांमुळे गंभीर आजारी रुग्णांमध्ये प्रती 1,000 मध्ये 49 कमी मृत्यू झाले आहेत.