डेडलाईन चुकते? चिडचिड होते?- Take it Slow!!

By admin | Published: May 12, 2017 06:20 PM2017-05-12T18:20:50+5:302017-05-12T18:20:50+5:30

रात्री झोप नाही? अस्वस्थ वाटतं? उदास आहात? मग जरा स्लो व्हा!

Paying Deadlines? Irritated? - Take it Slow !! | डेडलाईन चुकते? चिडचिड होते?- Take it Slow!!

डेडलाईन चुकते? चिडचिड होते?- Take it Slow!!

Next

- निशांत महाजन


तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही? झोप लागली तरी खूप स्वप्न पडतात? मधूनच जाग येते? सकाळी उठल्यावर अस्वस्थ वाटतं? खूप उदास वाटतं? उठावंसंच वाटत नाही? तुम्ही कामं पुढे ढकलता? तुमची कामं कधीच वेळेत पूर्ण होत नाहीत? तुमच्या डेडलाइन चुकतात? आपल्याला खूप काम आहे असं सतत वाटतं? एक काम करताना अन्य कामं आठवत राहतात? चिडचिड होते? घरात कुणाशी बोलावंसं वाटत नाही? फोन सतत जवळ लागतो, व्हॉट्सअ‍ॅप सारखं उघडून पाहता?
-ही सारी लक्षणं जर तुमच्यात असतील तर समजा की तुम्हाला स्लो डाऊन करायची गरज आहे. जगभर ‘टेक इट स्लो’ असं म्हणणारी एक नवीनच जीवनशैली आता विकसित होते आहे. ती म्हणजे जरा शांत व्हा, शांत बसा, आहे ते जगा, पळू नका, हुसहुस करु नका, जरा जगायचा प्रयत्न करा. अर्थात हे अनेकांना सांगून कळत नाही, पण तिशीत हार्ट अ‍ॅटॅक, बीपीचा त्रास, स्ट्रेस, आणि यासाऱ्यासा मानसिक अस्वास्थ्य हे सारं मागे लागतं. नाती मोडतात. त्यांचा ताण येतो, नात्यात आनंद नाही, पैशात नाही, करिअरमध्ये नाही, जगण्यात नाही. आनंद ही भावना जाणवतच नाही. आणि मग या टेक इट स्लोचं महत्व कळायला लागतं.
टेक इट स्लो म्हणजे आपल्या महत्वाकांक्षा सोडणं नव्हे, गरीबीत जगणं नव्हे. तर वर्तमानात जगणं, शांत होवून जगणं, इतरांशी स्पर्धा कमी करुन, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकसह इतरांना दाखवण्यासाठीच्या गोष्टी कमी करून ज्यात आपल्याला आनंद मिळेल असं जगणं. हे सारं वाचायला सोपं वाटत असलं तरी, प्रत्यक्षात करणं कठीण आहे.
म्हणून या टेक इट स्लोच्या बालवाडीपासून आपण सुरुवात करायला हवी. त्यासाठी करायच्या या ५ गोष्टी. सुरुवात करुन पहा, आपण रोज एवढं सुद्धा जगत नाही याची खात्री पटेल.



१) भूक लागण्यापूर्वी जेवा
विचारा स्वत:ला तुम्ही रोज कधी जेवता? खूप भूक लागल्यावर जेवता? आॅफिसमध्ये लंचटाईम होतोच म्हणून जेवता? की जेवायला वेळच नसतो तुम्हाला? अनेकदा असंच होतं. आपल्याला आता काही वेळात भूक लागणार आहे हे शरीर सांगत असतं, पण ते आपल्याला कधीच ऐकू येत नाही. पण जरा शांत रहा, कळेल की आपल्याला भूकेची जाणीव होतेय. पोटात खड्डा पडण्यापूर्वी ही जाणीव होताच जेवा! शांतपणे.

२)खाताय काय?
काल डब्यात कुठली भाजी हातेी असं विचारलं तर शंभरात ९० लोकांच्या दांड्या उडतील. कारण खाताना आपलं भाजीकडे, तिच्या चवीकडे, सुगंधाकडे,रंगाकडे लक्षच नसतं. आपल्या लक्षात त्याच गोष्टी राहतात ज्या आपल्याला महत्वाच्या वाटतात. चवी आठवत नाहीत कारण आपलं लक्ष नव्हतं जेवणात. भाजीकडे, पोळीच्या पोताकडे, स्पर्शाकडे लक्ष द्या. सोपं नाही हे, पहा जमतंय का..

३) आंघोळ करता ना?
दररोजच करतो आपण. पण पाण्याचा स्पर्श अनुभवलाय कधी? पहिला थेंब अंगावर कधी पडला हे जाणवतं? अभ्यास सांगतो की, हा स्पर्श जाणवला तर आपल्या मेंदूत जरा शांततेची केंद्र जागी होतात. आपला अटेन्शन स्पॅन वाढतो. आंघोळ उरकू नका, ती अनुभवा. पहा आपल्या शरीरात स्वच्छता आणि चैतन्याचा काही अंश जाणवतो का?

४) वेळ नाही म्हणता?
वेळ नाही म्हटलं की तो निघतच नाही. एक तरी गोष्ट आपल्या आयुष्यात असतेच जी आपल्याला खूप आवडते. त्यात नफ्यातोट्याचा विचार नसतो. ती करा. जे आवडतं ते, इतर काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्हाला जे आवडतं त्यासाठी रोज फक्त ५ मिनिटं द्या.

५) रोज १ नवी ओळख
तुमचा फोनवर अफाट संपर्क असेल? प्रत्यक्षात तुम्ही रोज एका नव्या माणसाला भेटता का? वेगळ्या फिल्डमधल्या, वेगळं बोलणाऱ्या? किती दिवस झाले तुम्ही प्रत्यक्ष माणसांना भेटून, ओळख करुन? तसं करू नका. जरा व्हर्च्युअल लाइफ कमी करा, प्रत्यक्ष माणसांना भेटा. त्यातून तुम्हाला जो आनंद मिळेल, जो वर्तमानाचा एक फील मिळेल त्यानं तुम्हाला शांतही वाटेल आणि प्रसन्नही!

Web Title: Paying Deadlines? Irritated? - Take it Slow !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.