पीसीओडी: मुलींनो, वेळीच दखल घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 01:19 AM2018-12-10T01:19:50+5:302018-12-10T01:20:13+5:30
नवयुगातील मुलींनी, महिलांनी विविध क्षेत्रामध्ये घेतलेली आघाडी हा निश्चितच कौतुकाचा विषय आहे. प्रगतीची ही सुरुवात ज्या वयात केली जाते, त्याच वयात दुसरीकडे ती तिच्या शरीरातील निसर्गनियमानुसार घडणाऱ्या बदलांना सामोरी जात असते.
नवयुगातील मुलींनी, महिलांनी विविध क्षेत्रामध्ये घेतलेली आघाडी हा निश्चितच कौतुकाचा विषय आहे. प्रगतीची ही सुरुवात ज्या वयात केली जाते, त्याच वयात दुसरीकडे ती तिच्या शरीरातील निसर्गनियमानुसार घडणाऱ्या बदलांना सामोरी जात असते. त्यामुळे 'तिच्या' सर्वतोपरी यशामध्ये तिच्या आरोग्याचा खूप मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. काही काळ सलगपणे आरोग्याकडे दुर्लक्ष होत राहिले तर यशाचा कायमस्वरूपी उच्चतम टप्पा गाठणे निश्चितच कठीण होऊ शकते. या प्रगतीसाठी आणि अर्थातच 'अपत्यानां मूलं नार्य: परं नृणाम।' या तिच्या सृजनक्षमतेचा विचार मनात ठेवून शाळकरी वयापासूनच मुलींच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे.
काळजी घेण्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो .
निरोगीत्वासाठी केलेले प्रयत्न! (यात प्रतिबंधक उपाययोजना, उत्तम जीवनशैली, आहारविहार सर्व समाविष्ट होते.)
शारीरिक व मानसिक बदलांवर बारकाईने लक्ष ठेवणे.
अगदी साध्या प्रकारे लक्ष ठेवले तरी
यातूनच आपल्याला ती थोडी स्थूलतेकडे झुकते आहे का?
तिचे मन अस्थिर आहे का? ('मूड स्विंग्स ' )
मासिक पाळी अनियमित आहे का व मासिक पाळीच्या संबंधित आणखी तक्रारी आहेत का? आदी गोष्टी लक्षात येतात व यातूनच ‘पीसीओडी’ या आजाराची सुरुवात असेल तरी लक्षात येते.
'पॉली सिस्टिक ओव्हरी '
म्हणजे अनेक ( लहान) गाठी असणारी बीजांडे. दर महिन्याला निसर्गनियमानुसार मासिक पाळी येते तेव्हा नियमितपणे एक स्त्रीबीज हे पक्व होऊन गर्भधारणेसाठी तयार झालेले असते. ते गर्भधारणा न झाल्यामुळे गर्भाशयातील अंतस्त्वचेबरोबर पाळीमार्फत बाहेर टाकले जाते. मात्र पीसीओडी असणाºया मुली/महिलांमध्ये स्त्रीबीज नियमित तयार होत नाही. एकाऐवजी दहा-बारापेक्षा अधिक स्त्रीबीजे कमी-अधिक प्रमाणात अयोग्य वाढून त्याच्या गाठी बीजांडात दिसतात.
वयात आल्यापासून ते रजोनिवृत्तीच्या अलीकडच्या कालावधीत सुमारे २० टक्क्यांहून अधिक महिलांमध्ये अशा प्रकारचे ‘पॉली सिस्टीक ओव्हरी’चे रुग्ण आढळतात. एका सर्वेक्षणानुसार भारतात पीसीओडी असणाºया महिलांचे प्रमाण एक दशलक्षाहून अधिक असावे. तसेच वंध्यत्व असणाºया सुमारे ३०% टक्के महिलांमध्ये पीसीओडी हे कारण आढळते. विशेष गोष्ट अशी, की ‘पीसीओडी’ हा आजार शहरी तसेच ग्रामीण दोन्ही भागांत आढळतो.
पीसीओडी असणाºया जास्तीत जास्त रुग्ण या स्थूल अथवा स्थूलतेकडे झुकणाºया असतात (ओबेज पीसीओ), किंबहुना स्थूलतेमुळे पीसीओडी होण्याची शक्यता खूपच वाढते. तसेच बारीक अशक्त मुली/महिलांमध्ये देखील हा आजार आढळतो. त्यास लीन पीसीओडी असे म्हणतात.
पीसीओडी / पीसीओएस उपचार
सर्वप्रथम होऊ नये म्हणून करण्याचे उपाय
सुयोग्य जीवनशैली = योग्य व वेळेवर घरचा पोषक आहार.
जंक फूड टाळणे, बेकरीचे, जड पदार्थ न खाणे, शक्यतो ताजे गरम रुचकर पारंपरिक अन्नपदार्थ मुलींना दिले पाहिजे. विशेषत: शाळेचा डबा देताना यानुसार योग्य नियोजन केले पाहिजे. यात एक महत्त्वाची गोष्ट जी आजकाल अतिजागरुकतेमुळे चुकू शकते ती म्हणजे लागोपाठ दिला जाणारा जड आहार! उदा. शाळेत जर जेवणाच्या सुट्टीत नीट पोळीभाजी १ ते दीडच्यामध्ये खाल्ली असेल तर शाळेतून आल्यावर ३ वाजता पुन्हा जेवण करावयास लावणे अथवा इतर विकतचे बेकरी पदार्थ देणे, यामुळे अपचन, वजन व पोटाचा घेर वाढणे आदी दुष्परिणाम होतात. मुली मंद व आळशी बनू शकतात व पीसीओडीसारखे आजार होतात.
खेळ व इतर व्यायाम
प्रत्येक मुलीने दिवसातील ठराविक वेळ हा खेळण्यासाठी / व्यायामासाठी राखून ठेवलाच पाहिजे.
शाळेत खेळाच्या तासाला मैदानावर न खेळता झाडाखाली अथवा वर्गात बसून राहणे चुकीचे आहे. अपवाद फक्त आजारपणाचा!
तसेच अभ्यास व ईतर छंदवर्ग याचे योग्य नियोजन करून आपापल्या आवडीनुसार बॅडमिंटन/पोहणे/टेनिस इत्यादीसाठी वेळ काढणे आवश्यक आहे.
वजन व उंचीचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे. काही विशिष्ट योगप्रकार देखील यासाठी उपलब्ध आहेत.
तणाव व्यवस्थापन
जीवनशैलीचे व तणावाचेदेखील नियोजन करणे हे अगदी शाळकरी मुलींमध्येही आवश्यक झाले आहे.
यामध्ये ताणतणाव टाळणे महत्त्वाचे आहे. यात अगदी लहानसहान गोष्टींचापण यात समावेश असतो. ज्याचे महत्त्व बरेचदा पालकांच्या लक्षात येत नाही.
उदाहरण द्यायचे झाले तर माझ्या एका दहावीत शिकणाºया पेशंटला तिच्या खासगी शिकवणी वर्गातील पुढच्या रांगेतील जागा मिळाली नाही की फार वाईट वाटायचे.
उंचीमुळे तिला पुढे बसायचे असायचे.
क्लासच्या वेळेपूर्वी कमीतकमी वीस मिनिटे ती तिथे हजर असायची
मात्र, या रुटीनमध्ये ट्रॅफिक अथवा पालकांच्या व्यस्ततेमुळे जर थोडा उशीर झाला तर तिला नकळतपणे खूप ताण येत असे.
कळत-नकळत अशा अनेक गोष्टींचा ताण शरीरावर गंभीर परिणाम करत असतो.
तणाव पूर्णपणे टाळणे अशक्य आहे; पण त्याचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळणे हे फक्त आपल्याच हातात आहे.
सध्याच्या फास्ट जगात जशी नवीन पिढी अतिशय हुशार आहे तशाच नवयुगातील मातादेखील सर्व गोष्टी छान मॅनेज करणाºया आहेत. आपापले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य व करियर सांभाळून आपल्या मुलींनादेखील त्या योग्य पद्धतीने घडवतील व पीसीओडीपासून देखील दूर ठेवतील, यात शंका नाही.
काय आहे हे पीसीओडी?
पीसीओडी म्हणजे 'पॉली सिस्टीक ओव्हेरीयन डिसीज.' स्त्रियांच्या ओटीपोटातील गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असणाºया बीजांडांमध्ये द्रवस्वरूप गाठी निर्माण होणे! याला 'पीसीओएस - ' पॉली सिस्टिक ओव्हेरीयन सिन्ड्रोम असेदेखील संबोधले जाते.
सिन्ड्रोम यासाठी की हा एक विविध लक्षणांचा लक्षणसमुच्यय आहे. स्त्रीच्या स्त्रीत्वाला बाधा आणणारा , तंत्रयुगात अनेक कारणांमुळे वाढत जाणारा हॉर्मोन्स असंतुलन असणारा हा आजार असून, ऋतुचक्राच्या सुरुवातीपासून त्याकडे लक्ष देण्याची व होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची आवश्यकता आहे.
पीसीओडी / पीसीओएस लक्षणे
अनियमित मासिक पाळी, अनियमित अथवा अत्यल्प स्राव,
काहींमध्ये औषधांशिवाय न येणारी पाळी.
चेहºयावर पुरळ/मुरूम
अनावश्यक ठिकाणी विशेषत: श्मश्रूस्थानी (पुरुषी हार्मोन्स स्रीशरीरात वाढल्यामुळे) केस उगवणे, डोक्यावरील केस गळणे.
वाढलेले/वाढत जाणारे वजन/पोटाचा घेर / प्रमाणबद्ध शरीराचा अभाव
वंध्यत्व, बिघडलेले मानसिक स्थैर्य.
यातील सर्वच लक्षणे एका वेळी प्रत्येकीत आढळतीलच असे नाही. मात्र, प्रत्येक लक्षणाबद्दल जागरूकता आवश्यक आहे.
पीसीओडी कारणे
आनुवंशिक
इन्सुलिन प्रतिरोधन
स्थूलत्व
अयोग्य जीवनशैली
चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव व ताणतणाव.
पीसीओडी / पीसीओएस निदान
सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मनाने कोणतेही उपाय करू नयेत.
त्यानुसार स्वत: संपूर्ण तपासणी (क्लिनिकल एक्झामिनेशन) करून तुमचे डॉक्टर सोनोग्राफी व रक्ताच्या तपासण्या करावयास सांगतील.