व्यक्ती १८ नाही तर 'या' वयात होतात प्रौढ - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 10:37 AM2019-03-25T10:37:22+5:302019-03-25T10:37:59+5:30
अनेकदा गमती गमतीमध्ये एक तिशीतला मित्र दुसऱ्या तिशीतल्या मित्राला तू म्हातारा झालास, असं म्हणताना अनेकदा ऐकलं असेल.
(Image Credit : The Independent)
अनेकदा गमती गमतीमध्ये एक तिशीतला मित्र दुसऱ्या तिशीतल्या मित्राला तू म्हातारा झालास, असं म्हणताना अनेकदा ऐकलं असेल. अनेकदा व्यक्ती प्रौढ कधी होतो यावरूनही वेगवेगळी मते ऐकायला मिळतात. पण नुकत्याच एका रिसर्चमधून याचा खुलासा करण्यात आला आहे. या रिसर्चनुसार, व्यक्ती तोपर्यंत अॅडल्ट म्हणजेच प्रौढ होत नाहीत, जोपर्यंत ते ३० वय ओलांडत नाहीत. मेंदूच्या अभ्यासकांनुसार, मेंदूचा पूर्ण विकास १८ नाही तर ३० व्या वयात पूर्ण होतो.
अभ्यासकांचं म्हणणं आहे की, व्यक्तीच्या मेंदूमध्ये नर्व्सचे कार्य, विकासाशी निगडीत प्रक्रिया गर्भापासून सुरू होऊन अनेक दशकांपर्यंत सुरू असते. मेंदूच्या विकासाची प्रक्रिया आणि त्यामुळे होणाऱ्या बदलांचा तरूणांच्या व्यवहारावर मुख्य प्रभाव पडत असतो. याने ते मानसिक समस्यांबाबत अतिसंवेदनशील होतात.
किशोरावस्था संपल्यावरही सुरू असतो विकास
किशोरावस्थेदरम्यान अनेकदा लहान मुलांमध्ये व्यवहाराशी संबंधित समस्या बघायला मिळतात. याकडे या वयात मेंदूमध्ये होणाऱ्या बदलांशी जोडून बघितलं जातं आणि असं मानलं जातं की, किशोरावस्था संपल्यावर ही समस्या दूर होईल, पण असं नसतं.
कॅम्ब्रिज विश्वविद्यालयात न्यूरोसायंटिस्टचे प्राध्यापक पीटर जोन्स यांच्यानुसार, 'बालपणापासून प्रौढ स्थितीत पोहोचण्याबाबत जी परिभाषा मानत आलो आहोत, आता ती बालिश वाटायला लागली आहे'.
मेंदूबाबत या सर्व गोष्टी मिथक
'बाल्यावस्थेपासून प्रौढ होताना मेंदूचा विकास फार सूक्ष्म होतो आणि ही प्रक्रिया साधारण तीन दशकांपर्यंत सुरूच असते. शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि कायदे व्यवस्थेने त्यांच्या सुविधेसाठी ही परिभाषा ठरवली आहे', असं ते म्हणाले.
प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूचा विकास वेगळा
कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील प्राध्यापक डेनिअल गेश्विंद यांनी यावर जोर दिला आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूच्या विकासाचा स्तर वेगवेगळा असतो. ते म्हणाले की, व्यावहारिक कारणांमुळे, शिक्षण प्रणालीने व्यक्तींऐवजी समूहांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी चूक केली आहे.
अभ्यासकांनी स्किट्जोफ्रेनियासारख्या मनोवैज्ञानिक स्थितींवर पर्यावरणाच्या पडणाऱ्या प्रभावावर चर्चा केली. त्यांच्यानुसार, किशोरावस्था आणि अर्ली ट्वेन्टीजमध्ये स्किट्जोफ्रेनियाची लक्षणे दिसणे सामान्य बाब आहे. एकदा मेंदूने जर त्याचे सर्किट छाटले आणि पूर्णपणे त्याचा विकास झाला तेव्हा व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारच्या मनोविकृतीचा धोका कमी होतो.
प्राध्यापक जोन्स यांच्यानुसार, जे लोक शहरांमध्ये राहतात, खासकरून गरीब आणि प्रवासी लोकांना आजूबाजूच्या पर्यावरणीय प्रभावांमुळे मानसिक विकारांचा धोका जास्त राहतो.