कितीही गोंधळ असला तरी गाडीत झोप कशी लागते?; संशोधनातून समोर आलं 'रॉकिंग' कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:40 PM2021-09-30T17:40:39+5:302021-09-30T17:41:13+5:30
शास्त्रीय संशोधनातून समोर आली रंजक माहिती
अनेकदा आपल्याला अंथरुणावर पडल्या पडल्या झोप येत नाही. खूपदा कुस बदलूनही डोळा लागत नाही. मात्र रेल्वे, बसमध्ये बसल्यावर अवघ्या काही मिनिटांमध्ये छान झोप लागते. काही जण तर रेल्वे, बसमध्ये बसून छान डुलक्या काढतात. त्यामुळे अनेकदा ते इच्छित स्थळाच्या पुढे निघून जातात आणि मग झोपेमुळे भलताच मनस्ताप होतो. पण बस, ट्रनमध्ये इतका गोंधळ असताना, बिछाना, उशी नसताना झोप कशी काय लागते, याचा विचार तुम्ही कधी केलाय का?
कार, ट्रेन, बसमध्ये निवांत झोप येण्यामागे अनेक कारणं आहेत. काहींना वाटतं प्रवासादरम्यान डोकं शांत असतं. त्यामुळे झोप येते. तर काहींना वाटतं प्रवासादरम्यान चेहऱ्यावर छान हवा लागते. त्यामुळे लगेच झोप येते. मात्र यामागचं शास्त्रीय कारण थोडं वेगळं आहे. प्रवासादरम्यान कार, बसमध्ये रॉकिंग सेन्सेशन जाणवतं. त्यामुळेच बस, कार सुरू होताच अनेकांना पटकन झोप लागते.
रॉकिंग सेन्सेशन म्हणजे काय?
लहान मूल पटकन झोपी जावं म्हणून आपण त्याचा पाळणा हलवतो. पाळणा हलवू लागताच बाळाला झोपू येऊ लागते. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान आपलं शरीर थोडं थोडं हलू लागलं. रॉकिंग सेन्सेशन जाणवू लागल्यानं झोप येऊ लागते.
शरीर एकाच फ्लोमध्ये हलत असल्यानं झोप येते
जेव्हा शरीर हळूहळू एकाच फ्लोमध्ये हलतं, तेव्हा त्याला रॉकिंग सेन्सेशन म्हणतात. याचा मेंदूवर सिक्रोनाइजिंग इफेक्ट होतो आणि आपण हळूहळू स्लिपिंग मोडमध्ये जातो. याला स्लो रॉकिंग असंही म्हणतात. यामुळे झोपण्याची इच्छा मनात तयार होते. एका संशोधनादरम्यान लोकांना विविध प्रकारच्या बेड्सवर झोपवण्यात आलं. पाळण्याप्रमाणे हलणाऱ्या बेडवरील लोकांना लवकर झोप आल्याचं यावेळी दिसून आलं.