क्षयरुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची ‘आय.जी.आर.ए’ चाचणी करणार!

By स्नेहा मोरे | Published: July 21, 2022 04:11 PM2022-07-21T16:11:50+5:302022-07-21T16:21:09+5:30

Tuberculosis : या चाचणीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या सुदृढ व्यक्तिला क्षयरोगाची लक्षणे नसताना देखील क्षयरोगाचे संक्रमण झाले असल्यास, त्याची खातरजमा करण्याकरीता आय.जी.आर.ए. चाचणी केली जाते. 

People in close contact with tuberculosis patients will be tested by 'I.G.R.A.' | क्षयरुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची ‘आय.जी.आर.ए’ चाचणी करणार!

क्षयरुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची ‘आय.जी.आर.ए’ चाचणी करणार!

Next

- स्नेहा मोरे

मुंबई :  लोकसंख्येची घनता लक्षात घेता मुंबई हे भारतातील सर्वांत मोठे व दाट लोकवस्तीचे शहर आहे. त्यामुळेच मुंबईसारख्या शहरात क्षयरोग (Tuberculosis / TB) प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने व क्षयमुक्त मुंबईचे ध्येय गाठण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे केंद्रीय क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वस्तरीय उपाययोजना व्यापकपणे, प्रभावीपणे व नियमितपणे राबविण्यात येतात. याच अंतर्गत आता क्षयरुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची आय.जी.आर.ए. (IGRA / Interferon Gamma Radioimmune Assay) ही अत्याधुनिक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येणार आहे. क्षयरोग प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणा-या या उपक्रमाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या विभाग प्रमुख तथा कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे. 

या उपक्रमांतर्गत ज्यांच्या थुंकीमध्ये क्षयरोगाचे जंतू आढळून आले आहेत, अशा क्षयरोगाचे निदान झालेल्या रूग्णाच्या निकटच्या संपर्कातील, निकटच्या सहवासातील व्यक्तिंची व कुटुंबियांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. ही चाचणी प्रामुख्याने सदर घरातील इतर कुटुंबियांना क्षयरोग आजार असल्याबाबत देखील निदान व्हावे, या दृष्टीने त्यांची क्षयरोग विषयक आय.जी.आर.ए. (IGRA / Interferon Gamma Radioimmune Assay) ही अत्याधुनिक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येणार आहे. या चाचणीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या सुदृढ व्यक्तिला क्षयरोगाची लक्षणे नसताना देखील क्षयरोगाचे संक्रमण झाले असल्यास, त्याची खातरजमा करण्याकरीता आय.जी.आर.ए. चाचणी केली जाते. 

आय.जी.आर.ए. वेद्यकीय चाचणीचा अहवाल हा ‘सुप्त – क्षयरोग’ (TB Infection) यासाठी बाधित नसल्याचे निदर्शनास आल्यास  सदर व्यक्तिला क्षयरोगाचे संक्रमण नसल्याची खातरजमा होते. तथापि, अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून क्षयरोग बाधेबाबत सदर व्यक्तिची त्या पुढील २ वर्षे पर्यंत नियमितपणे पाठपुरावा तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकारची पाठपुरावा तपासणी प्रत्येक ६ महिन्यातून एकदा यानुसार करण्यात येईल. 
मात्र, जर आय.जी.आर.ए. वैद्यकीय चाचणीचा अहवाल हा ‘सुप्त – क्षयरोग’ यासाठी बाधित असल्याचे निदर्शनास आल्यास सदर व्यक्तिला ‘क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार’ (TB Preventive Therapy- TPT) हे आठवड्यातून एकदा व एकूण १२ आठवडे दिले जातील. तसेच क्षयरोग बाधेच्या अनुषंगाने पुढील २ वर्षे त्या व्यक्तिचा नियमितपणे पाठपुरावा केला जाईल. 

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, आय.जी.आर.ए. वैद्यकीय चाचणी करण्याकरीता एका खाजगी प्रयोगशाळेबरोबर बृह्न्मुंबई महानगरपालिकेने करार केला आहे. या करारा अंतर्गत सदर उपक्रमाच्या सर्व बाबी (end to end management) संबंधित प्रयोगशाळेद्वारे करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुदृढ व्यक्तिंची यादी घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, त्यांच्या घरी जाऊन रक्ताचे नमुने घेणे, चाचणी करणे व चाचणीचा अहवाल   जिल्हा क्षयरोग अधिका-याला देणे ह्या सर्व बाबी समाविष्ट असणार आहेत. 

वैद्यकीय प्रयोगशाळेला क्षयरोग प्रतिरोधी उपचाराकरीता पात्र सदस्यांची यादी देण्यात आल्यावर त्यांचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्या यादीतील व्यक्तिंच्या सोयीनुसार वेळ घेऊन सदर घराला भेट देतील. त्यांनतर वैद्यकीय चाचणीसाठी रक्ताचे नमुने गोळा करून चाचणी झाल्यावर चाचणीचा अहवाल  जिल्हा क्षयरोग अधिका-याला  देण्यात येईल. सदर अहवालातून क्षयरोग बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असल्यास संबंधितांना क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचाराची औषधे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दवाखाने व रुग्णालयांमधून निशुल्क देण्यात येतील. 

या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मुंबईकर नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, क्षयरोग विषयक वैद्यकीय चाचणी करण्यासाठी येणा-या प्रतिनिधींना आवश्यक ते सहकार्य करावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोगविरोधी लढ्यास बळ द्यावे.

Web Title: People in close contact with tuberculosis patients will be tested by 'I.G.R.A.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य