पाळी पुढे ढकलण्याची गोळी अन् रजोनिवृत्तीआधीचा 'पिरियड'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 04:02 PM2018-09-06T16:02:30+5:302018-09-06T16:06:47+5:30

येणाऱ्या सणासाठी सगळी जय्यत तयारी झाली. पण एक महत्त्वाच्या प्रश्नावर तिला उत्तर सापडत नव्हतं. तो प्रश्न म्हणजे त्याच दिवसात नेमकी पाळी आली तर काय करायचं?

Period Delaying Pills and symptoms of Perimenopausal period | पाळी पुढे ढकलण्याची गोळी अन् रजोनिवृत्तीआधीचा 'पिरियड'

पाळी पुढे ढकलण्याची गोळी अन् रजोनिवृत्तीआधीचा 'पिरियड'

googlenewsNext

- डॉ. नेहा पाटणकर

गौरी गणपती पुढच्या आठवड्यावर आले आणि श्रुतीने बाप्पाच्या आणि गौरींच्या ठेवणीतले दागिने आणि डेकोरेशनच्या सामानाची साफसफाई करायला घ्यायचं ठरवलं. पण ठरवल्यापासून कितीतरी दिवस हे काम मागे पडत होतं. हल्ली तिचं असंच व्हायचं. कुठलीही गोष्ट करायची ठरवली की ती करण्याचा उत्साह कमी व्हायला लागला होता. खरं म्हणजे ऑफिस किंवा घरी काहीच ताण वाढलेला नव्हता. पण नेहमीच्याच कामांचा बाऊ वाटणं, चिडचिड होणं, शारीरिक आणि मानसिक थकवा हे आता रोजचंच झालं होतं. वयाच्या 42व्या वर्षी हे नॉर्मल आहे का?, असं तिला सारखं वाटत राहायचं.

येणाऱ्या सणासाठी सगळी जय्यत तयारी झाली. पण एक महत्त्वाच्या प्रश्नावर तिला उत्तर सापडत नव्हतं. तो प्रश्न म्हणजे त्याच दिवसात नेमकी पाळी आली तर काय करायचं? पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घ्यायच्या का? 3 महिन्यांनी मागच्या महिन्यात पाळी आली होती पण आता या महिन्यात काय? आपण सणांच्या मध्ये पाळी यायला नको म्हणून घेतलेल्या गोळ्यांचाच हा दुष्परिणाम आहे का? असा विचार सतत डोक्यात येऊन झोपेचा पार विचका झाला होता.

श्रुतीसारखाच अनुभव कमी-अधिक प्रमाणात रजोनिवृत्तीच्या आधीच्या "या वळणावर" बऱ्याच स्त्रियांना येऊ शकतो. या रजोनिवृत्तीच्या अवतीभवतीच्या काळाला "perimenopausal period" म्हणतात. 45 ते 55 या वयात साधारण रजोनिवृत्ती होते. पण पाळी पूर्णपणे थांबण्याच्या आधी हार्मोन्स खूप वर-खाली होत असतात. मग या संक्रमणातून जात असताना त्याची लक्षणं अक्षरशः एखाद्या सी-सॉ प्रमाणे येत जात असतात.
 
त्यातली काही लक्षणं खालीलप्रमाणेः

1. पाळीची अनियमितता, अधिक रक्तस्त्राव
2. चिडचिडेपणा, अनुत्साह (mood swings)
3.  हॉट फ्लशेश
4. अंगदुखी, थकवा
5. वारंवार युरीन इन्फेक्शन
6. वजन वाढणे
7. त्वचा कोरडी पडणे

ही सगळीच लक्षणं किंवा त्रास सगळ्यांनाच होतो असंही नाही आणि त्याची तीव्रताही प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असू शकते. या लक्षणांचा पाळी पुढे ढकलण्यासाठी तरुणपणी घेतलेल्या गोळ्यांशी थेट संबंध आहे, असं म्हणण्यासाठी कुठलाही ठोस आधार नाही. पण, पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेऊन आपण हार्मोन्सशी खेळच करतो. त्यामुळे अगदीच गरज असेल तेव्हाच ही गोळी घेणं श्रेयस्कर. 

प्रजननासाठी काम करणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन एकमेकांच्या हातात हात घालून एरवी काम करत असतात पण हे कामाचं चक्र बिघडल्यावर मात्र खूप शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरं होतात. शरीराच्या छाती, मान आणि कानाच्या भागात अचानक गरमपणा (heat) जाणवतो आणि 4/5 मिनिटांनी घाम फुटतो हा टिपिकल hot flushes चा विचित्र अनुभव येऊ शकतो. हे रात्री झालं तर झोपेची सायकल बिघडते. थकवा जाणवायला लागतो, चिडचिडेपणा वाढतो. इस्ट्रोजेनचा आधार कमी झाल्यामुळे हाडं ठिसूळ व्हायला लागतात, त्वचा कोरडी पडायला लागते. योनीमार्गाची (vaginal) त्वचा कोरडी पडल्याने तिथे खाज सुटते.वारंवार युरीन इन्फेक्शन होतं.

Perimenopausal period साधारण 6 महिने ते 3 वर्षं इतका असू शकतो.

रजोनिवृत्तीकडे जाणारा हा रस्ता घाटाचा, वळणावळणाचा आणि काही ठिकाणी खड्ड्यांचा असू शकतो. यामागचं शास्त्रीय कारण समजून घेऊन याला सामोरं गेलं तर हाच रस्ता एक "Smooth Ride" बनून जातो. 

आपल्या प्रतिक्रिया कळवाः wisdomclinic@yahoo.in

Web Title: Period Delaying Pills and symptoms of Perimenopausal period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.