घोरणाऱ्या व्यक्तीचा आपण घोरतो यावर विश्वासच बसत नाही; तुम्ही झोपेत घोरत असाल तर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:55 AM2021-07-30T05:55:58+5:302021-07-30T05:56:23+5:30
घोरण्याबद्दल आणि त्याच्यामुळे असलेल्या गाढ (?) झोपेबद्दल आपल्या समाजात अनेक समज/ गैरसमज आहेत
रामायणामधली कुंभकर्णाची गोष्ट सगळ्यांनाच चांगली माहिती आहे. सहा महिने जागणे आणि सहा महिने सतत झोपणे अशी त्याची ख्याती!
युद्ध सुरू होताच चिंतित रावणाने कुंभकर्णाला उठवायचा निर्णय घेतला. वाल्मिकींनी कुंभकर्णाच्या घोरण्याचे मोठे रंगतदार वर्णन केले आहे. ते लिहितात, कुंभकर्णाच्या घोरण्याच्या आवाजाने अख्खी गुहा हादरत होती! त्याला उठवायला गेलेले राक्षस त्या आवाजामुळे बेशुद्ध झाले! कर्णे, भेदी, दुंदुभि इत्यादी वाजंत्र्यांचा आवाज त्या घोरण्यापुढे निष्प्रभ ठरत होता... आणि या सगळ्या गोंधळामध्ये कुंभकर्ण मात्र गाढ झोपला होता.
घोरण्याबद्दल आणि त्याच्यामुळे असलेल्या गाढ (?) झोपेबद्दल आपल्या समाजात अनेक समज/ गैरसमज आहेत. १९९६ साली भारत-भेटीसाठी आलेल्या माझ्या मामाने प्रश्न विचारला होता, “काय अभिजित, सध्या काय नवीन शिकतो आहेस?” मी म्हटले “स्लीप मेडिसिन!” त्यावर मामा थंडपणे म्हणाला, “अरे, ही सगळी वेस्टन फॅडं आहेत. भारतीयांना याची गरज नाही; कारण इथले लोक कधीही / कुठेही झोपू शकतात! अगदी लोकलमध्येदेखील घोरायला लागतात!”
- घोरणे आणि अतिनिद्रा ही सौख्याची लक्षणे आहेत, असा अनेकांचा गोड गैरसमज असतो.
एखाद्या व्यक्तीला तो किंवा ती घोरते हे पटवण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपल्या मोबाइलमध्ये त्याचा आवाज आणि शक्य झाल्यास व्हिडिओ टेप करून ठेवणे. कारण अनेकदा घोरणाऱ्या व्यक्तीचा आपण घोरतो यावर विश्वासच बसत नाही.
गाढ झोपेत झालेल्या अनेक गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. एखाद्या कारणामुळे आपण जागे झालो ही बाब दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्मरणात राहण्यासाठी ती जाग कमीतकमी साठ सेकंदांची असावी लागते. तरच त्या बाबीची नोंद (रजिस्टर) होते. जर एखादा माणूस रात्रभरात शंभरवेळेला जरी उठला; पण ६० सेकंदांच्या आत झोपला तर सकाळी उठल्यावर त्याला फ्रेश, ताजेतवाने वाटणार नाही. पण, “रात्रभरात किती वेळेला उठलात?” याचे उत्तर तो “एकदाही नाही” असेच देईल. - तर घोरणे! त्याबद्दल अधिक पुढल्या शुक्रवारपासून, येथेच!
- डॉ. अभिजित देशपांडे,
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस
iissreports@gmail.com