डुकराच्या किडनीने ब्रेन डेड व्यक्तीचा पुनर्जन्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 05:19 AM2021-10-23T05:19:16+5:302021-10-23T05:19:35+5:30

अनेकदा अनेक कारणांनी पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं किंवा कृत्रिम उपायांनी त्यांचं ‘मरण’ लांबवलं जातं पण, जोपर्यंत ते ते अवयव त्यांना मिळत नाहीत, मिळाले तरी त्यांच्या शरीराशी ‘जुळत’ नाहीत, तोपर्यंत अशा अधांतरी अवस्थेतच त्यांना जगावं लागतं. 

Pig kidney transplant to human Surgeons pass pig kidney transplant test to brain dead human | डुकराच्या किडनीने ब्रेन डेड व्यक्तीचा पुनर्जन्म!

डुकराच्या किडनीने ब्रेन डेड व्यक्तीचा पुनर्जन्म!

googlenewsNext

जगभरात अशी किती माणसं आहेत, जी म्हटलं तर जिवंत आहेत आणि म्हटलं तर मृत!. त्यांचं हृदय सुरू असलं तरी वैद्यकीयदृष्ट्या ब्रेनडेड असलेली ही माणसं केवळ तांत्रिकदृष्ट्याच जिवंत असतात. वैद्यकीय मदतीनं त्यांना बराच काळ ‘जिवंत’ ठेवता येऊ शकत असलं तरी सर्वसामान्य माणसांप्रमाणे ती चालू, फिरू, बोलू शकत नाहीत.. मानवी अवयवांची संपूर्ण जगभरातच कमतरता आहे. कोणी हृदयाची प्रतीक्षा करतंय, कोणी किडनीची प्रतीक्षा करतंय, कोणी फुप्फुसांची, तर कोणी डोळ्यांची.. अनेकदा अनेक कारणांनी पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं किंवा कृत्रिम उपायांनी त्यांचं ‘मरण’ लांबवलं जातं पण, जोपर्यंत ते ते अवयव त्यांना मिळत नाहीत, मिळाले तरी त्यांच्या शरीराशी ‘जुळत’ नाहीत, तोपर्यंत अशा अधांतरी अवस्थेतच त्यांना जगावं लागतं. 
पण, विविध कारणांनी ब्रेनडेड झालेल्या, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना जीवदान मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्याचं कारण म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे शास्त्रज्ञांनी केलेला नुकताच एक अभिनव प्रयोग. अशा प्रकारचा जगातला हा पहिलाच प्रयोग मानला जात आहे.

किडनीचे कार्य थांबल्यावर न्यूयॉर्क येथील एक रुग्ण ब्रेनडेड झाला होता. अत्यावश्यक उपचार म्हणून त्याला काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण, असं रुग्णाला किती दिवस ठेवणार? भरमसाठ खर्चाचा तर प्रश्न असतोच; पण सगळेच अधांतरी लटकून राहतात. त्यामुळे या रुग्णाच्या नातेवाईकांनीही त्याचं व्हेंटिलेटर काढण्याची सूचना डॉक्टरांना केली. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनीच या रुग्णाच्या नातेवाईकांना त्यापासून रोखलं. असाही तुमचा पेशंट वाचण्याची आशा नाही तर, आम्हाला काही प्रयोग करू द्या, कदाचित त्यामुळे पुनर्जन्मही मिळू शकेल, अशी विनंती केली. नातेवाईकांनीही डॉक्टरांची विनंती मान्य केली. त्यामुळे डॉक्टरांनी या पेशंटला कृत्रिमरित्या जिवंत ठेवलं आणि दुसरीकडे आपले प्रयोगही सुरू ठेवले. जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे एका डुकराची किडनी या रुग्णाला बसवण्यात आली. आश्चर्य म्हणजे ही किडनी ताबडतोब काम करायला लागली. गेले काही महिने व्हेंटिलेटरवर असलेल्या या रुग्णाला  आता पुनर्जन्म मिळेलच, पण किडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो रुग्णांमध्येही आशेची नवी पालवी त्यामुळे फुलली आहे. न्यूयॉर्कच्या एन. वाय. यू लँगून ट्रान्सप्लान्ट इन्स्टिट्यूटमध्ये ही यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली. ही किडनी व्यवस्थित चालते की, नाही, हे, पाहण्यासाठी ५४ तास ती शरीराबाहेरच ठेवून तिला रक्तवाहिन्या  जोडण्यात आल्या होत्या. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार डुकरांचे अनेक अवयव माणसांमध्ये ट्रान्सप्लांट करता येऊ शकतात. त्यामुळे विशेषत: डुकरांची फुप्फुसं आणि यकृतांची मागणी येत्या काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढेल.

याआधीही डुकरांच्या अनेक अवयवांचं माणसांवर प्रत्यारोपण करण्यात आलं आहे आणि ते यशस्वीही झालं आहे. त्यात डुकराच्या हृदयाचे व्हॉल्व्हज, डायबेटिसच्या पेशंट्सना डुकराचे स्वादुपिंड आणि आगीने अंग भाजल्यामुळे डुकराची त्वचा.. इत्यादी अनेक प्रकारचे अवयव माणसांना बसविण्यात आले आहेत. नव्या संशोधनामुळे केवळ अमेरिकतल्याच किमान दीड लाख रुग्णांना फायदा होईल, जे विविध अवयवांच्या प्रत्यार्पणासाठी प्रतीक्षा यादीत आहेत. जगभरात किमान एक कोटीपेक्षा अधिक लोक किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत. अमेरिकेतही सुमारे एक लाख रुग्ण केवळ किडनीच्या प्रतीक्षेमुळे रुग्णालयात खिळून  जीवन-मरणाशी झुंज घेत आहे. किडनीसाठी ‘वेटिंग लिस्ट’वर असलेल्या रुग्णांपैकी रोज किमान बारा लोकांचा मृत्यू होतो, असंही एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. 

हा प्रयोग यशस्वी झाला असला, तरी यावर अजून खूप मोठं संशोधन बाकी आहे. तरीही हा प्रयोग मानवासाठी क्रांतिकारी ठरेल असं अनेक संशोधकांना वाटतं. ‘जॉन्स हॉपकिन्स स्कूल’चे ट्रान्सप्लांट सर्जरी संदर्भातील निष्णात डॉ. डोरी सेगेव यांचं म्हणणं आहे, ही घटना म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील मैलाचा दगड आहे. त्यामुळे अनेक रुग्णांसाठी आणि संशोधकांसाठीही वेगळी वाट निर्माण झाली आहे. 

जनावरांच्या अवयवांचे ‘प्रयोग’!
महत्त्वाच्या अवयवांसाठी या अगोदरही काही प्राण्यांचा उपयोग करण्यात आला आहे. पण, हे प्रयत्न फारसे यशस्वी ठरले नाहीत. १९६० च्या दशकात चिम्पांझीच्या किडनीचा वापर मानवासाठी करण्यात आला होता, पण, त्यातील बऱ्याच जणांचा काही दिवसांतच मृत्यू झाला. केवळ एक रुग्ण सर्वाधिक म्हणजे नऊ महिने जिवंत राहिला होता. १९८३ मध्ये ‘बॅबून’ या माकडाच्याच एका प्रजातीच्या हृदयाचे प्रत्यारोपण एका नवजात बाळावर करण्यात आले होते. हा प्रयोग ‘सफल’ तर झाला, पण तो ‘यशस्वी’ होऊ शकला नाही. कारण त्यानंतर केवळ २० दिवसांतच या बाळाचा मृत्यू झाला. पण, डुकराच्या किडनीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे या दिशेने आता वेगाने प्रयत्न सुरू होतील. लाखो लोकांना त्यामुळे जीवदान मिळू शकेल. इतर प्राण्यांच्या अवयवांचीही यामुळे आता मोठ्या प्रमाणात चाचणी सुरू झाली आहे.

Web Title: Pig kidney transplant to human Surgeons pass pig kidney transplant test to brain dead human

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.