प्रेयसी, पत्नीला फसवणाऱ्या पुरुषांसाठी औषध येणार; गोळी खाल्ल्यावर पुरुष प्रामाणिक होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 05:13 PM2022-02-08T17:13:46+5:302022-02-08T17:14:32+5:30
बाहेरख्यालीपणा करणाऱ्या पुरुषांसाठी खास औषध येणार
नात्यांमध्ये विश्वास महत्त्वाचा असतो. कोणतंही नातं विश्वासावर टिकून असतं. त्या विश्वासाला तडा गेल्यावर ते नातं टिकवणं अवघड होतं. पण कधी कधी साथीदाराकडून फसवणूक होते आणि नातं तुटतं. काही पुरुष त्यांच्या महिला साथीदाराची फसवणूक करतात. त्यांचे बाहेर संबंध असतात. याचा फटका मात्र त्यांच्या साथीदाराला बसतो. आता अशा पुरुषांसाठी एक नवं औषध येणार आहे.
महिला साथीदाराला अंधारात ठेऊन बाहेरख्याली करणाऱ्या, अवैध संबंध ठेवणाऱ्या पुरुषांसाठी औषध तयार करण्यात येत आहे. क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी आणि मेटाबॉलिज्म जर्नलमध्ये याबद्दलची माहिती नुकतीच प्रकाशित झाली. ज्या पुरुषांना हाइपरसेक्शुअल डिसऑर्डरचा त्रास असतो, त्यांच्या शरीरात ऑक्सिटॉसिन हार्मोन्सचं प्रमाण अधिक असतं. ऑक्सिटॉसिनला लव्ह हार्मोन्सदेखील म्हटलं जातं. कामेच्छा जागृत करण्याचं काम ऑक्सिटॉसिन हार्मोन्स करतात.
औषध तयार करण्याचा भाग म्हणून एक अभ्यास करण्यात आला. त्यात हाइपर सेक्शुअल डिसऑर्डरची समस्या असलेल्या ६४ पुरुषांचा सहभाग होता. यासोबतच शारिरीक स्थिती उत्तम असलेल्या ३८ जणांचाही अभ्यासात समावेश होता. शरीरात ऑक्सिटॉसिनचं प्रमाण अधिक असलेल्या व्यक्तीच शारिरीक संबंधांसाठी आपल्या साथीदाराला फसवत असल्याचं संशोधनातून समोर आलं.
ऑक्सिटॉसिन आणि सेक्शुअल हायपरटेंशनचा एकमेकांशी थेट संबंध आहे. त्यामुळे आता शास्त्रज्ञांनी ऑक्सिटॉसीनचं प्रमाण कमी करणाऱ्या औषधावर काम सुरू केलं आहे. शरीरातील ऑक्सिटॉसीनचं प्रमाण कमी झाल्यास पुरुष महिलांची फसवणूक करणार नाहीत. ते दुसऱ्या महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवणार नाहीत, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.