CoronaVirus News : तीन उपायांच्या मदतीनं सरकार कोरोनाला थोपवणार; लढ्याला यश मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:51 AM2020-06-22T02:51:52+5:302020-06-23T10:43:42+5:30
अशा व्यक्तींच्या शरीरातील प्लाझमा कोरोना रुग्णांना दिल्यास त्यांना त्याचा फायदा होतो. तेही या आजारातून लवकर बरे होतात असे दिसून आले आहे.
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने तीन गोष्टींच्या साहाय्याने या आजाराविरोधात अधिक तीव्र लढा देण्याचे ठरविले आहे. कोरोना रुग्णांची अँटिजन किटच्या साहाय्याने चाचणी करणे, या रुग्णांवरील उपचारांत प्लाझमा थेरपीचा वापर तसेच रुग्णांलयामध्ये खाटांसाठी लावण्यात येणाऱ्या शुल्काला चाप लावणे अशा तीन उपाययोजना केल्या आहेत.
दिल्लीत खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारांपोटी किती पैसे आकारावेत याचे प्रमाण सरकारने ठरवून दिले आहे. त्यामुळे सर्व खासगी रुग्णालयांत आता समान दर असतील.
दिल्लीमधील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना चाचण्यांचे अहवाल लवकर मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी दिल्लीत अँटिजन किटद्वारे चाचणी करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यातच घेण्यात आला. या चाचणीसाठी लागणारा किट दक्षिण कोरियातील एका कंपनीने बनविला आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तात अँटीबॉडिज तयार झालेल्या असतात. अशा व्यक्तींच्या शरीरातील प्लाझमा कोरोना रुग्णांना दिल्यास त्यांना त्याचा फायदा होतो. तेही या आजारातून लवकर बरे होतात असे दिसून आले आहे.
>दिल्लीकरांना मिळाला दिलासा
रुग्णालयांतील एकूण खाटांपैकी ६० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी सांगितले की, कोरोनाच्या रुग्णांना दाखल करून घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या नियमांचे खासगी रुग्णालयांनी पालन करावे.