प्लास्टिक फक्त पर्यायवरणासाठीच नाही आरोग्यासाठीही धोकादायक, शरीराची होते अपरिमित हानी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 06:07 PM2022-02-02T18:07:40+5:302022-02-02T18:10:02+5:30
प्लास्टिकमुळे फक्त पर्यावरणाचीच नाही तर आपल्या शरीराचीदेखील हानी होते. प्लास्टिकचे मानवी आरोग्यावर विविध वाईट परिणाम होतात.
प्लास्टिक (Plastic) ही गोष्ट आपल्या जीवनशैलीचा (Lifestyle) एक महत्त्वाचा भाग झाली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात असंख्य कारणांसाठी प्लास्टिक वापरलं जातं. प्लास्टिक पर्यावरणासाठी (Environment) घातक आहे. प्लास्टिकमुळे फक्त पर्यावरणाचीच नाही तर आपल्या शरीराचीदेखील हानी होते. प्लास्टिकचे मानवी आरोग्यावर विविध वाईट परिणाम होतात.
पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर प्लास्टिकचा वाईट परिणाम होतो. आपण वापरत असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये आढळणारं फॅलेट्स (Phthalates) पुरुषांमधील टेस्टेस्टेरॉनचं उत्पादन कमी करतात. टेस्टेस्टेरॉन हे पुरुषांमध्ये स्पर्माटोझा (Spermatozoa) तयार होण्यास उत्तेजन देणारं हार्मोन आहे. प्लास्टिकचा आणखी एक घातक परिणाम समोर आला आहे. प्लास्टिकमुळे लठ्ठपणासुद्धा वाढतो. अलीकडील काळात झालेल्या संशोधनात असं दिसून आलं आहं की, प्लास्टिकमधील संयुगं (Compounds) आपल्या चयापचय क्रियेमध्ये व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठीही (Weight Gain) प्लास्टिक कारणीभूत ठरू शकतं.
नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Norwegian University of Science and Technology) आणि फ्रँकफर्टमधील गोथे युनिव्हर्सिटीतील (Goethe University in Frankfurt) रिसर्चर्सनी एकत्रितपणे केलेल्या स्टडीमध्ये (Study) प्लास्टिकचा नवीन घातक परिणाम समोर आला आहे. या स्टडीदरम्यान, दह्याचे कंटेनर (Yogurt containers), पाण्याच्या बाटल्या (Water Bottles), स्वयंपाकघरातील स्पंज अशा दैनंदिन वापरातील एकूण ३४ वस्तूंचा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक वस्तूमध्ये ५५ हजारांपेक्षा जास्त केमिकल काँपोनंट्स (Chemical Components) आढळले.
आयडेंटिफाय केलेल्या ६२९ घटकांपैकी ११ घटक हे चयापचय (metabolism) क्रियेवर परिणाम करणारे घटक म्हणून ओळखले जातात. त्याहूनही वाईट म्हणजे हे घटक लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. प्लास्टिकमध्ये असलेल्या एक तृतीयांश केमिकल काँपोनंट्सनी लिपिड संचयन करणाऱ्या पेशींच्या विकासास हातभार लावल्याचं रिसर्चर्सच्या निदर्शनास आलं आहे. या काँपोनंट्सच्या उपस्थितीमुळे पेशींची संख्या वाढते आणि अधिक चरबी जमा होते, हे स्टडीमध्ये लक्षात आलं आहे.
सर्वांत जास्त चिंताजनक बाब म्हणजे, प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये अशी काही रसायनं आढळली आहेत जी पूर्वी घातक असल्याचं माहिती नव्हतं. परंतु, आता या रसायनांमुळे चरबी वाढण्यास कारणीभूत असलेल्या पेशींचा (Fat cells) विकास होतो, हे स्पष्ट झालं आहे.
प्लास्टिकमधील घटक अन्नामध्ये जाऊ शकतात, हे या पूर्वीच सिद्ध झालेलं आहे. विशेषतः जेव्हा प्लास्टिक कंटेनरमध्ये गरम खाद्यपदार्थ भरले जातात तेव्हा हा प्रकार घडण्याची सर्वात जास्त शक्यता असते. त्यामुळे प्लास्टिकमध्ये खाद्यपदार्थ पॅक करणं टाळलं पाहिजे आणि अशा कटेनरमधलं अन्न शक्य तितक्या कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे.