भातापेक्षा पोहे आरोग्यासाठी कित्येकपटीने फायदेशीर, का? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 05:10 PM2022-06-05T17:10:05+5:302022-06-05T17:12:35+5:30

भारतीयांच्या आहारांमधील या प्रमुख घटकाचा आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा आहे. चव आणि आरोग्याचे संतुलनठेवणाऱ्या पोह्याचे अनेक फायदे आहेत. सध्या खाणपाणाच्या बिघडलेल्या सवयींमुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे.

pohe is better than rice know the reasons | भातापेक्षा पोहे आरोग्यासाठी कित्येकपटीने फायदेशीर, का? घ्या जाणून

भातापेक्षा पोहे आरोग्यासाठी कित्येकपटीने फायदेशीर, का? घ्या जाणून

googlenewsNext

घरी एखादा पाहुणा आला किंवा आपण कुणाच्या भेटीला त्याच्या घरी गेलो की, नाश्त्यासाठी हमखास समोर येणारा पदार्थ म्हणजे पोहे. शहर, गावांमधील छोट्यामोठ्या हॉटेलांमध्येही गरमागरम पोह्यांची कढई सहज दिसून येईल. भारतीयांच्या आहारांमधील या प्रमुख घटकाचा आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा आहे. चव आणि आरोग्याचे संतुलनठेवणाऱ्या पोह्याचे अनेक फायदे आहेत. सध्या खाणपाणाच्या बिघडलेल्या सवयींमुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे.

निरोगी आयुष्याबाबत सजग असणारे लोक नेहमी पौष्टिक आहाराला प्राधान्य देतात. पौष्टिक आहारासह चवीला चांगल्या असणाऱ्या पदार्थांकडे लोकांचा ओढा जास्त आहे. पोहेही अशाच पदार्थांपैकी एक आहेत. भारतातील बहुतांश भागांमध्ये नाश्त्यासाठी पोह्याला पहिली पसंती असते. इतर ठिकाणच्या तुलनेत मध्य प्रदेशमध्ये आहारात पोहे खाण्याचा अधिक कल दिसून येतो. टीव्ही 9 हिंदीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

दिल्लीसह इतर शहरांमध्ये ‘इंदूरचे पोहे’ (Indori Poha) नावाने स्टॉल पाहायला मिळतात. काही जण तर दुपारच्या जेवणात सलाड (Salad) आणि स्प्राउट्स (Sprouts) मिसळून पोहे खातात. भाताच्या (Rice) तुलनेत पोहे अधिक पौष्टिक आणि फायदेशीर आहेत. काही ठिकाणी व्यक्ती भाताला पसंती देतात. पण याचा फायदा आणि नुकसान दोन्ही होऊ शकते. यामुळे शरीरावर विपरित परिणामही होऊ शकतो. बरेचदा वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञ लोकांना पोहे खाण्याचासल्ला देतात. चव आणि आरोग्य यांच्यात संतुलन ठेवण्याचं काम पोहे करतात. भातापेक्षा पोहे खाणं कधीही चांगलं आहे. यातून काय लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊयात.

आतडं चांगलं ठेवण्यासाठी पोहे उत्तम
पोहे बनवताना यावर फर्मेंटेशन (Fermentation) प्रक्रिया केली जाते. यात प्रोटिन (Protein) आणि कार्बोहायड्रेटच्या (carbohydrates) मेटाबॉलिझममधून (Metabolism) तयार झालेल्या चांगल्या बॅक्टेरियांचा समावेश असतो. या बॅक्टेरियांमुळे आतडं निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. भातापासून मात्र हा फायदा मिळत नाही. आपण नाश्ता करणार नसाल तर दुपारच्या जेवणातही पेाह्यांचा समावेश करू शकता. मुलांनाही पोहे खूप आवडत असतात.

लोहासाठी (Iron) पोहे उत्तम सोर्स
शरीराला आतून बळकट करण्यासाठी लोह खनिजाची खूप गरज असते. पोहे हे लोहाचा उत्तम सोर्स आहेत असं मानलं जातं. गर्भवती महिलेच्या शरीरात लोहाचं प्रमाण योग्य ठेवायचं असेल तर त्यांनी योग्य प्रमाणात पोह्यांचं सेवन करायला हवं. पोह्यांसोबत लिंबाचा वापर केल्यास काही प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ही (Vitamin C) आहारातून मिळू शकतं.

रक्तातील साखरही राहते नियंत्रित
पोह्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत मिळते. पोह्यांऐवजी भाताचं सेवन केलं तर भातातील स्टार्चमुळे रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे ब्लड शुगरचा त्रास झालेल्या म्हणजे डायबेटिस असलेल्या लोकांना भात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण देशी पोहे असतील तर याचा फायदा होऊ शकतो. पोहे बनवताना विविध भाज्या व मोहरीचं तेल वापरल्यास पोहे आणखी स्वादिष्ट आणि पौष्टिक बनतात.

Web Title: pohe is better than rice know the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.