हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असतं पोटॅशिअम, वाचा कोणत्या पदार्थांमधून मिळवाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 11:56 AM2024-10-03T11:56:22+5:302024-10-03T11:57:04+5:30
Potassium rich foods : सगळ्यांनाच हे माहीत असतं की, आपल्या शरीराला व्हिटॅमिन्स, प्रोटीनसोबतच वेगवेगळ्या खनिज पदार्थांची सुद्धा गरज असते. यातील एक महत्वाचा खनिज पदार्थ म्हणजे पोटॅशिअम.
Potassium rich foods : आजकाल लोकांची लाइफस्टाईल इतकी बदलली आहे की, जास्तीत जास्त लोक त्यांच्याच काही चुकांमुळे हृदयरोगांचे शिकार होत आहेत. देशात हृदयरोगाच्या रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोक कमी वयात हृदयरोगांमुळे आपला जीव गमावत आहेत. लोकांचं आपल्या आरोग्याकडे आणि शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं हेही याचं एक कारण आहे.
सगळ्यांनाच हे माहीत असतं की, आपल्या शरीराला व्हिटॅमिन्स, प्रोटीनसोबतच वेगवेगळ्या खनिज पदार्थांची सुद्धा गरज असते. यातील एक महत्वाचा खनिज पदार्थ म्हणजे पोटॅशिअम. शरीराच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये याचा वापर होतो. पोटॅशिअमचं उत्पादन शरीर करू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचा आहारात समावेश करून हे मिळवू शकता.
हृदयासाठी फायदेशीर पोटॅशिअम
हृदय निरोगी ठेवण्यासाठी, त्याची वेगवेगळी कामे सुरळीत होण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी पोटॅशिअमची गरज असते. ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या असते. त्यांनी पोटॅशिअमचं सेवन केल्यास स्ट्रोक आणि वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका कमी केला जातो. पोटॅशिअम हे शरीरात इलेक्ट्रोलाइटच्या रूपात काम करतं, ज्यामुळे हृदयाच्या मांसपेशी मजबूत राहतात आणि हृदयाचे ठोकेही सामान्यपणे होतात. अशात तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करून तुम्ही पोटॅशिअम मिळवू शकता हे जाणून घेऊ.
नारळ पाणी
नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच याचं नियमित सेवन केल्याने मांसपेशी आणि हृदयाची काम करण्याची क्षमताही वाढते. एक कप नारळ पाण्यात ६०० मिलिग्रॅम पोटॅशिअम असतं. कोणत्याही आजारामुळे आलेला अशक्तपणा दूर करण्यासाठी नारळाचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. तसेच याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
दही
एक कप दह्यात ३८० मिलीग्रॅम पोटॅशिअम असतं. प्रोबायोटिक गुण भरपूर असलेल्या दह्याने आपलं पचन तंत्र मजबूत राहतं. सोबतच हृदय सुद्धा निरोगी राहतं. यात असणारे गुड बॅक्टेरिया आपल्या आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतात. दही खाल्ल्याने भूक कमी लागते आणि त्यामुळे तुम्हाला वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. फक्त दह्यामध्ये फार जास्त साखर टाकून खाऊ नये.
संत्र्याचा ज्यूस
लिंबू आणि संत्रीसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे यात पोटॅशिअमही भरपूर असतं. एक कप संत्रा ज्यूसमध्ये ५०० मिलीग्रॅम पोटॅशिअम असतं. नियमितपणे या ज्यूसचं सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन आणि खनिज कमी होण्याचा धोका कमी होतो. तुमची इम्यूनिटी सुद्धा वाढते.
केळी
केळींमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं. एका केळीमध्ये साधारणपणे ४०० ते ५०० मिलीग्रॅम पोटॅशिअम असतं. तसेच केळींमध्ये व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी, फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि मॅग्नेशिअमही असतं. कच्ची आणि पिकलेली दोन्ही केळी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. केळीच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
पालक
पालकाची भाजी सगळ्यात जास्त फायदेशीर मानली जाते. यात अनेक पोषक तत्व असतात. पालकमध्ये पोटॅशिअमही भरपूर प्रमाणात असतं. एक कप पालकमध्ये ८४० मिलीग्रॅम पोटॅशिअम असतं. यात आढळणारे पोषक तत्व आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगले असतात. तसेच याने हाडेही मजबूत होतात.
टोमॅटो सूप
टोमॅटो सूपही पोटॅशिअमचं एक चांगलं स्त्रोत आहे. एक कप टोमॅटो सूपमध्ये साधारण ७२८ मिलीग्रॅम पोटॅशिअम असतं. टोमॅटो सूपचं सेवन केल्याने शरीरातील आतील सूज कमी करण्यास मदत मिळते.