माईण्डफुलनेस मेडिटेशन करा, एकाग्रता आणि सर्जनशिलता वाढेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:45 PM2017-09-09T15:45:16+5:302017-09-09T15:46:11+5:30

आपण एक काम करतो, पण डोक्यात हजारो विचार. जे काम करतो तिथंच चित्त एकाग्र होणं कसं जमावं?

practice mindfulness meditation to improve creativity and concentration | माईण्डफुलनेस मेडिटेशन करा, एकाग्रता आणि सर्जनशिलता वाढेल!

माईण्डफुलनेस मेडिटेशन करा, एकाग्रता आणि सर्जनशिलता वाढेल!

googlenewsNext
ठळक मुद्देआपण जे करतो, त्यात सजगता आवश्यक आहे. ते कौशल्य शिकून घ्यायला हवं

 . 

-डॉ. यश वेलणकर

आपण मुलांना सूचना देताना  ध्यान देऊन ऐका असे सांगतो. पण म्हणजे नेमके काय? ध्यान देणे, लक्ष देणे नेमके काय असते. कशानं हे लक्ष वाढेल, आपण लक्षपूर्वक काम करू. वर्तमानात रहायला शिकू. आणि कशामुळे आपली एकाग्रता वाढून आपण जे करतो त्या कामाचा आनंद घेता येईल? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हे ध्यान देणे म्हणजेच लक्ष देणे दोन प्रकारचे असते. 


1)एकाग्रता-


जे काही आपण पाहत,ऐकत, वाचत असू त्यावेळी मनात अन्य कोणतेही विचार येऊ न देता त्या कृतीवर पूर्ण एकाग्र म्हणजे एक अग्र होणे. कोणतेही लक्ष्य टिपायचे असेल तर एकाग्रता खूप महत्त्वाची असते. महाभारतातील अर्जुन थोर धनुर्धर झाला कारण त्याने नेम धरला की त्याला फक्त पक्ष्याचा डोळाच दिसत असे. अशी एकाग्रता सरावाने येते. असा मेंदूला दिलेला सराव म्हणजेच एकाग्रता ध्यान, फोकस्ड मेडिटेशन होय. आवाज, दृश्य, श्वासाचा स्पर्श किंवा एक विचार असे कोणतेही एक आलंबन ठरवायचे आणि त्यावर दीर्घकाळ मन एकाग्र करायचे. म्हणजे ते आलंबन सोडून मनात अन्य विचार आले तरी त्या कडे दुर्लक्ष करून मन पुनर्‍पुन्हा आलंबनावर न्यायचे।
असा नियमित सराव केल्याने मेंदूतील अटेन्शन सेंटर अधिक सक्रिय होते,त्यामुळे एकाग्रता वाढते.
विद्यार्थी, खेळाडू यांच्यासाठी हे कौशल्य खूप महत्वाचे आहे. शरीर सुदृढ आणि  निरोगी ठेवण्यासाठी रोज शारीरिक व्यायाम करायला हवा तसाच एकाग्रता वाढवण्यासाठी रोज मेंदूच्या या व्यायामासाठी किमान पाच मिनिटे द्यायला हवीत।
मात्न शरीराचा रोज एकाच स्नायूचा व्यायाम केला तर शरीर बेढब दिसू लागते कारण शरीराचा समतोल साधला जात नाही. मेंदूचेही तसेच आहे. केवळ एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचे काही दुष्परिणाम होतात. नेहमी फक्त फोकस्ड मेडिटेशन केले असता एकाग्रता वाढते पण सर्जनशीलता कमी होते असे आधुनिक संशोधनात आढळत आहे.
सर्जनशीलतेसाठी काहीतरी नवीन सुचणे, एखादा वेगळा विचार मनात येणे गरजेचे असते. एकाग्रतेचा सराव करताना मनात येणारे अन्य विचार आपण खुडून टाकत असतो, त्यावेळचे तेच ध्येय असते. पण सतत असेच करीत राहीलो तर नवीन,वेगळे विचार मनात येणे कमी होते, जे सर्जनशील कलाकारांना मारक आहेत. कवीला, लेखकाला, चित्रकाराला, उद्योजकाला नाविन्यपूर्ण कल्पना सुचाव्या लागतात. त्यासाठी एकाग्रता पुरेशी नसते, समग्रता आणि सजगता आवश्यक असते. ती विकिसत करण्यासाठी सजगता ध्यान करायला हवं. त्यालाच माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणतात. 


2)सजगता


हा लक्ष देण्याचा दुसरा प्रकार आहे. हे करताना कोणत्याही एकाच आलंबनावर लक्ष केंद्रित न करता त्याक्षणी शरीरात, मनात आणि  परिसरात जे काही घडते आहे ते जाणत राहणे. असे करताना आपण विचारांना थांबवत नाही पण त्यांच्यात गुंतून ही जात नाही. आपण विचारांकडे तटस्थपणे, साक्षीभावाने पहात असतो. असे पाहता येणे हे कौशल्य आहे आणि ते ही सरावाने वाढवता येते. हा सराव म्हणजेच सजगता ध्यान, तो ही मेंदूचा एक व्यायाम आहे।
लहान मुलांना हे दोन्ही व्यायाम शिकवले आणि  त्यांना त्याची गोडी निर्माण झाली की त्यांची एकाग्रता आणि  सर्जनशीलता दोन्ही वाढतात असे जगभरात दिसून येत आहे।

Web Title: practice mindfulness meditation to improve creativity and concentration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.